सरकार बदलले पण गायींच्या रक्ताचे पाट मात्र वाहतेच! संगमनेर पोलिसांची भूमिका संशयास्पद; गोवंश कत्तलीचा काळा डाग मिटता मिटेना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक दशकांपासून संगमनेरच्या बेकायदा कत्तलखान्यातून सुरु असलेली गोवंश जनावरांची हत्या वारंवारच्या कारवायांनंतरही थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आज मध्यरात्रीच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने आडवाटेच्या शिबलापूर रस्त्यावर केलेल्या कारवाईत तब्बल एक टन गोवंशाचे मांस हस्तगत करण्यात आले आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून पोलिसांनी शेकडों वेळा छापे घालूनही संगमनेरातील कत्तलखाने बंदच होत नसल्याने पोलिसांची भूमिकाही संशयात अडकली आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून संगमनेरात प्रभारी अधिकार्‍यांचे राज्य असल्याने हाती लागेल ते ओरबाडण्याची वृत्ती पोलिसांमध्ये भिनली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कधी नव्हे इतकी खालावली आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर येथील कत्तलखाने बंद होतील अशी अपेक्षा असताना तीे पोलिसांनीच फोल ठरवली असून शहरातून आजही गायींच्या रक्ताचे पाट वाहतेच आहेत.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. आज मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी आडवाटेच्या संगमनेर-शिबलापूर रस्त्यावरील शेतकी पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला. यावेळी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संगमनेरकडून येणार्‍या एका पांढर्‍या रंगाच्या पिकअप वाहनाला थांबवून त्याची तपासणी केली असता पोलिसांना त्यात जवळपास नऊशे किलो गोवंशाचे कत्तल केलेले मांस आढळून आले.

याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश गोलवड यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी मूळच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील मात्र गोवंशाच्या कत्तलीसाठी संगमनेरातच स्थायिक झालेल्या हलीम यूसुफ कुरेशी (वय 46, रा.भारतनगर) याच्यावर महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यासह प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 900 किलो गोवंशाचे मांस, दोन लाख रुपये किंमतीचा महिंद्रा पिकअप (क्र.एम.एच.14/इ.एम.0624) असा एकूण 3 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी (ता.27) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारच्या माहितीवरुन पोलिसांनी घुलेवाडी शिवारातील हॉटेल सम्राटजवळ सापळा लावून नाशिकहून संगमनेरकडे येणारा संशयीत टेम्पो रोखला. यावेळी केलेल्या तपासणीत पोलिसांना टेम्पोत कत्तलीच्या हेतूने अतिशय निर्दयपणे बांधून ठेवलेली सहा गोवंशाची वासरे आढळून आली. या प्रकरणी हवालदार भास्कर पिचड यांनी शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरुन नाशिकच्या इरफान नूर कुरेशी (वय 24, रा.वडाळानाका), जावेद सुलतान कुरेशी (वय 30) व जाकीर बशीर शहा (वय24, दोघेही रा.वडाळा गाव, ता.नाशिक) या तिघांवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये कारवाई करीत त्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 42 हजार रुपये किंमतीची सहा वासरे व चार लाख रुपये किंमतीचा टेम्पो (क्र.एम.एच.15/एफ.व्ही.3029) असा एकूण 4 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

दोन दशकांपूर्वी संगमनेर शहरातील मोगलपुरा परिसर गोवंश जनावरांच्या कत्तलीचे प्रमुख केंद्र होते. मात्र मागील काही वर्षांमध्ये या व्यवसायात असंख्य कसायांचा प्रवेश झाला असून भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रस्ता, रहेमतनगर अशा अनेक भागात दररोज मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल होते. दोन वर्षांपूर्वी अहमदनगर पोलिसांच्या पथकाने घातलेल्या छाप्यात येथील गोवंश कत्तलखान्यांची प्रचंड व्याप्ती राज्यासमोर आली होती. त्या कारवाईने राज्यात संगमनेरचे नाव ‘गोवंश कत्तलींचे प्रमुख केंद्र’ म्हणून कुप्रसिद्ध झाले. तेव्हापासून स्थानिक पोलीस शहरातील कत्तलखाने बंद असल्याचे खोटे दावे करीत आहेत व त्यांच्याकडूनच कारवाया होवून त्यांचे दावे तेच खोटे ठरवित आहेत.


काही पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना अमाप पैसा मिळवून देणार्‍या या बेकायदेशीर उद्योगाचा आणखी एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. संगमनेरच्या यापूर्वीच्या पोलीस अधिकार्‍याचे ‘कलेक्शन’ करणारे दोघे सध्याही एका अधिकार्‍याचे तेच काम करीत आहेत. त्यातील एका कर्मचार्‍याने 5 जानेवारी रोजी मोगलपुरा भागात छापा घालून 2 लाख 12 हजार 500 रुपयांचे 850 किलो गोवंशाचे मांस हस्तगत केले होते. त्या प्रकरणातील आरोपी सालेम साटम कुरेशी याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, मात्र त्यावेळी पोलिसांना आरोपी सापडला नव्हता.

त्यानंतर 23 जानेवारी रोजी पोलिसांनी पुन्हा त्याच ठिकाणी छापा घातला. विशेष म्हणजे या प्रकरणातील फिर्यादी पोलीस कर्मचारही तोच होता. यावेळी गुन्हा दाखल करताना पोलिसांनी मात्र चालाखी केली. छाप्याचे ठिकाण पश्चिमेकडून न दाखवता ते पूर्वेकडून दाखवताना राजवाड्याच्या समोर, मोगलपुरा असा पत्ता देण्यात आला. त्यातही कहर म्हणजे आधीच्या गुन्ह्यातील पोलिसांच्या मुखी फरार असलेला आरोपी या प्रकरणातील सूत्रधार असताना त्याला इतर आरोपींमध्ये दाखवण्याचाही खटाटोप करण्यात आला. त्या कारवाईतही पोलिसांना एक लाख रुपयांचे 400 किलो गोवंशाचे मांस हस्तगत झाले.

त्या प्रकरणात पोलिसांनी सोनू उर्फ आतिक रफिकर कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करीत पूर्वीच्या गुन्ह्यातील सालेम साटम कुरेशी याला इतर आरोपींच्या पंक्तीत नेवून बसविले. याचाच अर्थ लागोपाठच्या गुन्ह्यात एकच आरोपी दिसू नये यासाठी कायद्याच्याच डोळ्यात धूळ फेकण्याचे कारस्थान संबंधित कर्मचार्‍याने केले. विशेष म्हणजे या भागातील बहुतेक कत्तली वाड्यांमध्ये होतात, त्यामुळे पोलिसांचा छापा पडल्यानंतर कत्तल करणार्‍या आरोपींना पळून जाण्याची संधी अभावानेच मिळते. संगमनेरातील जवळपास सर्वच कत्तलखान्यांवर आजवर एक-दोन वेळा नव्हेतर शेकडोवेळा छापे पडले आहेत.

त्यातही शहर पोलीस ठाण्यातील बहुतेक पोलीस कर्मचारी गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून येथेच कार्यरत आहेत. त्यामुळे कत्तलखान्यांवरील या सर्व कारवायांमध्ये यातील प्रत्येक कर्मचार्‍याचा अनेकवेळा सहभागही होताच हे स्पष्ट आहे. याचाच अर्थ शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येक अधिकार्‍याला व कर्मचार्‍याला छापा घालण्याच्या ठिकाणांचा संपूर्ण भूगोल माहिती असताना आरोपी पळून गेला असे म्हणणं सूज्ञ नागरीकाला पटणार नाही. मात्र एकाच पोलीस कर्मचार्‍याच्या दोन भिन्न तक्रारीत असे घडले आहे. त्यामुळे येथील कत्तलखान्यांवर अशा कितीही कारवाया झाल्या तरी ते कधीही बंद होणार नाहीत हे वास्तव एकप्रकारे पुन्हा एकदा समोर आले आहे.


मध्यंतरी शहरातील एका पत्रकारावर दोनपेक्षा अधिक गुन्ह्यात सहभाग असल्याचे कारण देत तडीपारीचे हत्यार उगारण्यात आले होते. सदरील पत्रकाराने संगमनेरच्या कारागृहात कैद्यांनी साजरा केलेला वाढदिवस समारंभ, कैद्यांना मिळणार्‍या सुविधा, मोबाईल फोनचा वापर, पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्‍यांचे कारनामे आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी पोलिसांनी वरील कारवाईचा बडगा उगारुन त्या पत्रकाराला दडपण्याचा प्रकार केला. या प्रकरणात चक्क गोवंश कत्तलीच्या एकामागून एक गुन्ह्यात एकच आरोपी दिसू नये यासाठी पोलिसांचीच धावपळ शहराच्या बिघडलेल्या स्वास्थ्याचे सर्वोत्तम उदाहरण ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *