शिर्डी उपविभागीय कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू गुन्हेगारांची अद्ययावत माहिती गोळा करून तयार केली जातेय कुंडली


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी उपविभागीय कार्यक्षेत्रात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून टू प्लस उपक्रमांतर्गत गुन्हेगारांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येत आहे. तसेच जर गुन्हे करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती करत असेल तर वेळप्रसंगी त्याला हद्दपार करून कठोर उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासन मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिला.

जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय कार्यक्षेत्रात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने काही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांची अद्ययावत माहिती गोळा करून त्याची कुंडली तयार केली जात असून संशयित गुन्हेगारांच्या हालचालीवर देखील बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची माहिती जमा करून त्यांच्या सहवासात असणारे व त्यांना पाठबळ देणारे मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क ठेवणार्‍या व्यक्तींवर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे. खबरीचे जाळे मजबूत करण्यासाठी देखील उपाययोजना केली जात आहे. गुन्हेगारी, पाकीटमारी, मोबाईल चोरी, धूमस्टाईल चोरी व दुचाकी चोरी रोखण्यासाठी देखील पोलिसांचे काम सुरू आहे. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या काही आरोपींना देखील पोलिसांनी जेरबंद केलेले आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील म्हणाले, शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत जवळपास टू प्लस 78 गुन्हेगार असून त्यांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचे काम सुरु आहे. यातील गुन्हेगार पुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करणार नाही यासाठी देखील समुपदेशन केले जात आहे. त्याबरोबरच वेळोवेळी सूचना देऊनही जर संशियत गुन्हेगार यांच्यात सुधारणा झाली नाही तर अतिशय कठोर भूमिका पोलीस प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात असून नागरिकांनी देखील जर गुन्हेगारी कृत्य करणार्‍या गुन्हेगारांची माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी. माहिती देणार्‍या नागरिकांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल. त्याबरोबरच जनता व पोलीस सुसंवाद वाढविण्यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *