सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्त्यांचीच मुसंडी! पाचही जिल्ह्यात मोठा प्रतिसाद; चक्क प्रदेश उपाध्यक्षांची कन्याही मंचावर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन तब्बल पंधरवड्याचा कालावधी उलटूनही युवा नेते सत्यजीत तांबे आजही राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाने शिस्तभंगाचा ठपका ठेवून सहा वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित केले असले तरीही त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या प्रचारावर झाल्याचे अद्यापपर्यंत दिसून आलेले नाही. त्यांच्या प्रचार यंत्रणेत सुरुवातीपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा भरणा असून गुरुवारी तर चक्क काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांच्या लेकीनेच त्यांच्या राजकीय मंचावर हजेरी लावल्यानेे तांबेच्या प्रचारात काँग्रेस कार्यकर्त्यांनीच मुसंडी घेतल्याचे दिसू लागलेे आहे. यासर्व घडामोडींमधून नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात अंतर्गत गटबाजी आडवी आल्याचेही समोर आले असून पक्षाकडून मोठी चूक झाल्याचेही स्पष्टपणे समोर आले आहे.

सुरुवातीपासून मागणी करुनही प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली नाही. उलट त्यांची राजकीय कोंडी व्हावी यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी काही तास शिल्लक असताना पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी दाखल करण्याशिवाय अन्य पर्याय राहिला नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होवूनही आपला अर्ज भरला नाही. त्यामुळे काँग्रेसने डॉ. तांबे यांना या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईस्तोवर, तर सत्यजीत तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले.

मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघात गेल्या दीड दशकांत डॉ. सुधीर तांबे यांनी केलेली प्रचंड कामे आणि मतदारांशी निर्माण केलेला जिव्हाळा पक्षीय राजकारणापेक्षाही प्रबळ ठरला. त्यामुळे एकीकडे पक्षाने शिस्तभंगाच्या नावाने तांबे पिता-पुत्रांचे निलंबन करुनही त्यांनी सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण केलेल्या घरातून मात्र ते निलंबित होवू शकले नाहीत. किंबहुना आजवर प्रत्यक्ष मैदानात न उतरलेले कार्यकर्तेही पक्षाच्या या अन्यायकारक निर्णयानंतर सत्यजीत तांबे यांना विजयी करण्याचा मानस घेवून त्यांच्यासोबत प्रचारात आघाडी घेवू लागले आहेत. असेच चित्र अहमदनगरसह नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातून समोर येत आहे.

सध्या सत्यजीत तांबे खान्देशातील धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी पदवीधर व शिक्षकांचे मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून गावागावातील शिक्षक व पदवीधर मतदार तांबेंना पाठिंबा जाहीर करीत आहेत. तांबे यांनी जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी अशाच मेळाव्यांचे आयोजन केले होते. त्यातील लेवा भवनात झालेल्या मेळाव्यात जळगावचे माजी खासदार आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी थेट मंचावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिक्षक व पदवीधरांनी सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही केले.

प्रदेश पदाधिकार्‍यांच्या कन्येकडूनच सत्यजीत तांबे यांचा प्रचार होत असल्याने राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या भुंवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघात थोरात-तांबे कुटुंबाची राजकीय कोंडी करण्यासाठी थोरात विरोधी अंतर्गत गटाने दहा महिन्यात तीन पक्षांना स्पर्श करणार्‍या शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी डॉ. उल्हास पाटील यांची भेटही घेतली होती, त्यानंतर अवघ्या 48 तासांतच त्यांची लेक डॉ. केतकी सत्यजीत तांबे यांच्या मंचावर दिसून आल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी दाखल केल्याच्या क्षणापासून आपण काँग्रेस पक्षाच्या विचारांचे पाईक असून काँग्रेसचे विचार आपल्या रक्तात असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी अजूनपर्यंत भाजपाकडून पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्तेच त्यांच्या प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येत असून डॉ. सुधीर तांबे यांनी गेल्या 15 वर्षांत या पाच जिल्ह्यात 14 लाख किलोमीटर फिरुन काय कमावले याचे मूर्तीमंत उदाहरण या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांच्या प्रचारात काँग्रेसचेच कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यातून गेल्या 15 वर्षात डॉ. सुधीर तांबे यांनी केलेली प्रचंड कामे, त्यांचा अफाट जनसंपर्क आणि जवळपास 14 लाख किलोमीटरच्या प्रवासातून कमावलेल्या हजारो माणसांनी ही निवडणूक ताब्यात घेतल्याचे आणि सत्यजीत तांबे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निश्चय केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस जवळ येवून ठेपला असला तरीही तांबे यांनी अद्याप कोणाचाही पाठिंबा मागितला नसून आपण काँग्रेसच्या विचारांशी बांधील असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *