आंबीखालसा फाट्यावरील गतिरोधकावर विचित्र अपघात टेम्पो झाला पलटी तर कारमधील तिघेजण बालंबाल बचावले


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकावर एका वाहनाच्या धडकेत टेम्पो पलटी झाली असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये टेम्पोचालक जखमी झाला आहे तर कारमधील तिघेजण बालंबाल बचावले आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी (ता.27) सकाळी घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मालवाहू टेम्पो संगमनेरकडून पुण्याच्या दिशेने जात होता. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आंबीखालसा फाटा येथील गतिरोधकावर आला असता त्याचवेळी पाठीमागून येणार्‍या एका वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. पुन्हा याच वाहनाने कारला (क्र. एमएच.15, एचयू.5427) जोराची धडक दिली. त्यात कारमधील पती, पत्नी व मुलगी हे बालंबाल बचावले आहे. या अपघातात टेम्पो पलटी झाल्याने चालक कॅबिनमध्ये अडकला होता.

हा अपघात झाल्याचे पाहून तेथील रुग्णवाहिका चालक गणेश कहाणे, चेतन लेंडे यांनी धाव घेत टेम्पो चालकाला बाहेर काढले. टेम्पो चालकाच्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. दरम्यान आमचे दैव बलवत्तर असल्याने आम्ही बालंबाल बचावलो असल्याचे कार चालकाने सांगितले. या अपघातात टेम्पो व कारचे मोठे नुकसान झाले आहे. येथील गतिरोधकावर वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. यामध्ये आत्तापर्यंत अनेकजण जखमी झाले असून अनेकांना जीवही गमवावे लागले आहे. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

कारमधील कुटुंब हे नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथील रहिवासी आहेत. ते कारमधून संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होते. आंबीखालसा फाटा येथे आले असता त्याचवेळी एका वाहनाने टेम्पोला धडक दिली, त्यानंतर कारलाही धडक दिली. मात्र केवळ दैव बलवत्तर असल्याने कार पलटी झाली नाही. त्यामुळे कारमधील पती, पत्नी व मुलगी हे तिघेही बचावले. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *