प्रजासत्ताक दिनी संगमनेरातील व्यापार्‍याच्या घरावर भीषण दरोडा! बस स्थानकापासून काही अंतरावरील घटना; पिस्तुलाचा धाक दाखवून पाच लाख लुटले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक नाहीसा झाल्याचे सिद्ध करणारी घटना ऐन प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला समोर आली आहे. या घटनेत आत्तापर्यंत शहरा भोवतीच्या उपनगरांमध्ये धुडगूस घालणार्‍या मात्र अद्यापपर्यंत त्यांचा मागमूसही न लागलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने गुरुवारी थेट शहराच्या गजबलेल्या परिसरात मजल मारली. धक्कादायक गोष्ट म्हणजे प्रचंड वर्दळीच्या पुणे-नाशिक महामार्गावर घडलेल्या या घटनेत दरोडेखोरांनी घरातील एकटी महिला व दोन मुलांना पिस्तुलाचा धाक दाखवून अडीच लाखांच्या रोकडसह तब्बल दहा तोळ्यांचे दागिने घेवून पोबारा केला. या घटनेने शहराचे सामाजिक स्वास्थ पूर्णतः बिघडल्याचे स्पष्ट झाले असून शहर पोलिसांचे अस्तित्त्व असूनही नसल्यागत झाले आहे.


याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना प्रचंड वर्दळीने गजबजलेल्या पुणे-नाशिक महामार्गावरील सह्याद्री विद्यालयाजवळ प्रजासत्ताक दिनी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. या घटनेत सहा ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी विद्यालयाच्या शेजारीच असलेल्या भंडारी ऑईल मिलला लक्ष्य केले. या भागात भंडारी परिवाराचे विविध व्यवसाय व निवासस्थान आहे. पुढील भागात वास्तु वैभव हे दुकान असून त्या शेजारुन आत काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांचे निवासस्थान, ऑईल मिल व गोडावून आहे. ही स्थिती दरोडेखोरांसाठी पोषक ठरल्याचे या घटनेवरुन स्पष्टपणे समोर आले आहे.


प्रजासत्ताक दिनी सायंकाळी पावणे आठ वाजता घडलेल्या या घटनेच्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होती, माणसांचा राबताही मोठ्या प्रमाणात होता. परंतु सदरील घटना भंडारी यांच्या आतील भागात असलेल्या निवास्थानात घडल्याने आंत काय घडतेय याची कोणतीही कल्पना बाहेरील माणसांना आली नाही. याच सर्व पार्श्‍वभूमीचा फायदा घेत सुमारे सहा ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी भंडारी यांच्या निवासस्थानात प्रवेश केला.


येथे राहणार्‍या केदारनाथ भंडारी यांच्या घरात त्यावेळी त्यांची पत्नी शोभना, मुलगा पार्थ व त्याचा मित्र प्रणव तिघेच होते. घरात शिरताच दरोडेखोरांनी दोन्ही मुलांना पिस्तुलाचा धाक दाखवून सुरुवातीला त्यांना मारहाण करुन दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली. ते पाहून घाबरलेल्या शोभना भंडारी यांनी ‘तुम्हाला पाहिजे ते घ्या, पण मुलांना मारु नका’ असे वारंवार सांगत विनवण्या केल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेल्या 2 लाख 60 रुपयांच्या रोकडसह तब्बल साडेनऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेवून तेथून पोबारा केला.


या घटनेनंतर पोलिसांना कळविण्यात आले. मात्र तो पर्यंत दरोडेखोर आपला कार्यभाग उरकून ऐच्छिक ठिकाणी गायब झाले होते. याबाबत आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास शोभना केदारनाथ भंडारी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे. या घटनेने संगमनेरातील पोलिसांचे अस्तित्त्व शून्य झाल्याचे पुन्हा ऊ स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *