पाचही जिल्ह्यातील प्रत्येकाशी ऋणानुबंध कायम ः तांबे नंदुरबार येथे विराट मेळावा; सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अक्कलकुव्याच्या मणिबेलीपासून ते नगरच्या चौंडीपर्यंत अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थळ असलेल्या साडेपाचशे किलोमीटर परिसरात डॉ. सुधीर तांबेंनी मतदारांशी बनवलेला ऋणाणुबंध कायम चालू राहिला पाहीजे यासाठी आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहचत असल्याचे मत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले आहे. या मतदारसंघातील प्रत्येकाशी नामांकनावेळी आणि त्यानंतर झालेले राजकारण आमच्या परिवाराला अडचणीत आणण्यासाठीच झाले असून वेळ आल्यावर याबद्दल मी बोलेलच असा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सभेच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय उमेदवार आणि संघटनांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी होती.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील सर्वांच्या चर्चेचा विषय राहिलेले अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या प्रचारार्थ नंदुरबारमधल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना सत्यजीत तांबेंनी नामांकनाच्यावेळी झालेल्या नाट्यमय घडामोडी मतादारांसमोर मांडल्या. मी काँग्रेस पक्षाला सांगितले मला उमेदवारी द्या, परंतु काही कारणास्तव निर्णय झाला नाही. मी काँग्रेसकडून नामांकन देखील दाखल केले होते. मात्र माझा एबी फॉर्म माझ्यापर्यंत पोहचला नाही. त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी झाली असा खुलासा त्यांनी केला. गेली पंधरा वर्षे माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या कामाच्या जीवावर, त्याच्या जनसंपर्कातून, त्यांच्या स्वभावातून त्यांनी लोकांची मनं जिंकण्याचं काम या मतदारसंघात केले आहे. मागच्या पंधरा वर्षात शिक्षक, डॉक्टर्स, वकील, पदवीधर, बरोजगार यांच्या प्रश्नावर प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
मागच्या वीस वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून काम करत आलो आहे. आता मोठ्या व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाहिजे यातून ही उमेदवारी केली आहे. आठ दिवासांपासून प्रचारासाठी फिरत आहे. मतदारांचे प्रश्न गंभीर आहेत. अपुर्या शिक्षक, शिपाई, शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या, भरती नसल्याने यंत्रणेवर मोठा ताण, संस्थाचालकांचे प्रश्न आहेत. आज शाळा माजी विद्यार्थ्यी आणि लोकसहभागावर सुरु आहेत. त्यामुळेच आगामी काळात यासाठी व्यापक काम करणार आहे. याच अनुषंगाने एप्रिल महिन्यात दिवसीय शिक्षक परिषद घेणार असून यातून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला पंचवीस वर्षांचा पथ दाखविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
जुनी पेन्शन, नो टेन्शन म्हणत याबाबत माझ्या वडीलांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी विधान परिषदेमध्ये प्रश्न माडंला. अभ्यास मंडळ स्थापन करण्याची मागणी करत राजस्थान, हिमाचल प्रदेश राज्यांमध्ये पाठविण्याची मागणी केली. जुनी पेन्शनमध्ये दाखविली जाणारी आकडेवारी चुकीची असून वास्तवता तशी नाही, असे सांगत राजकीय इच्छाशक्ती असेल तर हा मुद्दा सुटेल. नाही तर जुनी पेन्शन मुद्दा आगामी काळात देशाच्या निवडणुकीचा मुद्दा होईल, असेही सत्यजीत तांबे म्हणाले. शिक्षण आणि आरोग्यसाठी या देशातल्या नागरिकांना एक पैसाही खर्च होता कामा नये या मताचा मी असल्याचे सांगत शिक्षणावर सात टक्के खर्च करायला हवा, मात्र आपण अडीच टक्केच खर्च करत असल्याचे सांगत त्यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, हिरालाल पगडाल, बी. एस. पाटील, नागेश पाडवी, यशवंत पाटील, मनोज रघुवंशी, एन. डी. नांद्रे, सुरेश झावरे, यूवराज पाटील आदिंसह संस्थाचालक, विवध संघटनांचे पदाधिकारी, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.