कोपरगाव शहरात चक्क अलिशान कारमधून शेळ्यांची चोरी पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करुन दोघांना घेतले ताब्यात


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
स्विफ्ट डिझायर कारमधून चक्क शेळ्यांची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगाव शहरात उघडकीस आला आहे. एका कारमध्ये चोर शेळ्यांना घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सिनेस्टाइल कारचा पाठलाग केला. शहराच्या मुख्य भागात हा सर्व प्रकार सोमवारी (ता.23) सकाळी सुरू होता. अखेर मोठ्या शिताफीने पोलिसांनी पाठलाग करुन चारचाकी वाहनासह दोघांना ताब्यात घेतलं आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजार असल्याने शहरातील बैल बाजार रोड येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. त्या बाजारात एका कारमधून शेळ्या नेल्या जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क करून एक पथक पाठवले. यामध्ये पोलीस कर्मचारी यमुनाजी सुंबे, जालिंदर तमनर, सचिन शेवाळे यांनी शेळ्या घेवून जाणार्‍या गाडीवर पाळत ठेवली. त्यांना बैल बाजार येथे पांढर्‍या रंगाची (एम. एच. 04 एफ. आर. 4279) चारचाकी गाडीत तीन व्यक्ती तीन शेळ्या घेऊन जात असल्याची खात्री पटली. पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरु केला.

चोरांना पोलीस आपला पाठलाग करत आल्याचे लक्षात येताच ते परत शहराच्या बाहेर निघण्यासाठी गर्दीतून सुसाट गाडी चालवत निघून जात होते. अगदी चित्रपटासारखा थरार अर्धा तास सुरू होता. चोरांनी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या जवळ पोलिसांना चकवा देण्याच्या प्रयत्नात त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. तितक्यात पाठलाग करणारे दोन पोलीस कर्मचारी पोहचले आणि गाडीतल्या तिघांना पकडले. परंतु त्यापैकी एक चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी चारचाकी गाडीची झाडाझडती घेतली असता चोरून आणलेल्या तीन शेळ्या आढळून आल्या. दरम्यान, पकडलेली गाडी आणि चोरांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी चोरांना पोलिसी खाक्या दाखवताच गाडीतल्या शेळ्या या विविध ठिकाणातील शेतकर्‍यांच्या चोरल्याचे चोरांनी कबुल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *