कोल्हार खुर्द येथील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा दोन तरुणींची सुटका तर एकावर राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहुरी
श्रीरामपूर भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या एका हॉटेलवर मंगळवारी (ता.24) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी दोन तरुणींची सुटका करून वेश्या व्यवसाय चालविणार्या एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी कोल्हार खुर्द परिसरातील नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या हॉटेल अपना नाष्टा सेंटर येथे प्रथम एक डमी ग्राहक पाठविण्यात आला. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच छापा टाकला. या कारवाईत दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. तर व्यवसाय चालविणार्या एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.
याप्रकरणी पोलीस नाईक आजिनाथ पाखरे यांनी यात दिलेल्या फिर्यादीवरून वेश्या व्यवसाय चालविणारा आरोपी वसंत रघुनाथ लोंढे (वय 56, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) याच्या विरोधात राहुरी पोलिसांत गुरनं. 92/2023 भादंवि कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस नाईक विकास साळवे, सचिन ताजणे, नदीम शेख, रोहित पालवे, महिला पोलीस नाईक मंजुश्री गुंजाळ, चालक जालिंदर साखरे आदी पोलिसांच्या पथकाने केली.