दरोडेखोरांची दहशत आता संगमनेर शहरातही पोहोचली! एकाच पसिरातील दोन बंगले फोडले; पोलीस ठाण्याचा दूरध्वनी गारठला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात संगमनेर शहरा लगतच्या ग्रामीणभागात यथेच्छ धुमाकूळ घातल्यानंतर सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळ्यांनी आता आपले लक्ष्य शहराकडे वळविल्याचे दिसत आहे. असाच प्रकार आज पहाटे शहरातील गोल्डनसिटी परिसरातून समोर आला असून जवळपास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी या परिसरातील अनेक बंगल्यांचा कानोसा घेवून त्यातील दोन बंगले फोडले. या घटनेत एका महिलेच्या घरातून सव्वा तोळ्यांच्या दागिन्यांसह आठ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली, तर बंद असलेल्या दुसर्‍या घरात उचकापाचक करुनही दरोडेखोरांना काहीच सापडले नाही. दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरु असतांना त्यांची माहिती देण्यासाठी काहींनी शहर पोलीस ठाण्याला दूरध्वनीही केला होता, मात्र सध्या पडलेल्या प्रचंड थंडीत तो गारठल्याने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करुन मदतीची याचना करण्याची वेळ स्थानिक रहिवाशांवर आली.


याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास शहरातील गोल्डनसिटी या प्रचंड गजबलेल्या परिसरात घडला. हातात लाकडी दांडके घेवून या परिसरात शिरलेल्या सहा दरोडेखोरांनी वसाहतीत सर्वत्र फिरुन विजेरीच्या उजेडात अनेक घरांची तपासणी केली. त्यात प्रामुख्याने घरांच्या व्हरांड्यात असलेले चपलांचे जोड, दुचाकी वाहनांची संख्या यावरुन ‘त्या’ घरांमध्ये किती माणसं राहतात याचा अंदाज घेवून दरोडेखोरांनी फोडायची ठिकाणं निवडल्याचे उपलब्ध झालेल्या सीसीटीव्हीवरुन स्पष्ट झाले आहे.


या घटनेत दरोडेखोरांनी फोडलेल्या दोन्ही घरांमधील रहिवाशी बाहेरगावी गेलेले असल्याचेही समोर आले आहे. पहिल्या घटनेत गोल्डनसिटीतील साहेबराव अरगडे यांचे घर फोडून घरात शिरलेल्या सहा दरोडेखोरांनी घरात सर्वत्र उचकापाचक केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सुजाता रहाणे यांच्या बंद असलेल्या बंगल्याकडे वळविला. या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी यथेच्छ उचकापाचक करीत घरातील कपाटांत ठेवलेले सव्वा तोळे वजनाचे आणि 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि आठ हजारांची रोकड असा एकूण 48 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.


विशेष म्हणजे गोल्डनसिटी परिसरात शिरल्यानंतर परिसरातील कुत्री मोठ्याने भूंकत असल्याने पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते यांना जाग आली. त्यांनी आपल्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहीले असता त्यांना सहा सशस्त्र दरोडेखोर बाजूलाच असलेल्या त्यांच्या बहिणीच्या बंद असलेल्या घरात दरोडा घालीत असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी तत्काळ संगमनेर शहर पोलीस ठाण्याला फोन करुन माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या पडलेल्या प्रचंड थंडीने सदरचा दूरध्वनी गारठल्याने वारंवार फोन करुनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.


त्यामुळे सातपुते यांनी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून त्यांना दरोडा पडत असल्याची माहिती दिली. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर पंधरा मिनिटांनी शहर पोलिसांचे वाहन गोल्डनसिटीत पोहोचले. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात गिरीराज नगर परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रकार घडला होता. मात्र सदरील बँकेने लावलेल्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेने त्याची माहिती बँकेच्या हैद्राबाद येथील मुख्यालयाला कळविल्यानंतर त्यांनी नगरच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन सूचना दिली.


त्यावेळी बँकेच्या मुख्यालयातून संगमनेर शहर पोलिसांना का कळविले गेले नाही असा प्रश्‍न उपस्थित झाला होता, गोल्डनसिटीतील दरोड्याच्या घटनेने त्याचे उत्तर दिले असून शहर पोलीस ठाण्यातील दूरध्वनी बंद असल्याचे समोर आले आहे. आज पहाटे घडलेल्या दरोड्याच्या प्रकाराबाबत संबंधित महिलेचे बंधु निलेश बादशहा रहाणे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गेल्या महिन्यापर्यत शहराभोवती घोंगावणारे दरोडेखोर आता शहरात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *