पक्षीय अभिनिवेशाशिवाय सत्यजीत तांबे विक्रमी मतांनी विजयी होतील! डॉ. सुधीर तांबे यांना ठाम विश्वास; कोणत्याही पक्षाचा पाठिंबा मागितला नसल्याचाही उच्चार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
यावर्षीच्या निवडणुकीत राजकीय परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. मात्र असे असतानाही आपण कोणत्याही राजकीय पक्षाकडून पाठींबा मागितलेला नाही. गेल्या 13 वर्षात नाशिक पदवीधर मतदारसंघात केलेली प्रचंड कामे आणि जोपासलेला जिव्हाळा यातून निर्माण झालेल्या ऋणानुबंधाच्या धाग्याने पक्षीय बंधने दूर सारुन आपल्याला पाचही जिल्ह्यातील लोकांनी नेहमी मदत केली आहे. तशीच परिस्थिती आज असून या मतदारसंघातील लोकांनी आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सत्यजीत तांबे यांना भरभरुन मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तरुण नेतृत्त्वाला संधी देण्यासाठी आपण घेतलेला थांबण्याचा निर्णय बहुतेकांना भावला असून हा निर्णय सत्यजीत तांबे यांना विक्रमी मतांनी विजयी करणारा ठरेल असा विश्वास नाशिक पदवीधर मतदार संघाचे सदस्य, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला.
कधीकाळी भाजपाचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मागील दीड दशकांपासून प्रतिनिधीत्व करणार्या डॉ. सुधीर तांबे यांनी आज संगमनेरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी भाजपाचा पाठिंबा मागणार का? या विषयावरही त्यांनी स्पष्टपणे भाष्य करीत 2009 सालच्या निवडणुकीची आठवण करुन देत त्यावेळी काँग्रेस आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार समोर असतानाही पाच जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्यावर विश्वास दाखवितांना प्रचंड मताधिक्क्याने आपणास विजयी केल्याचे सांगितले.
तशीच परिस्थिती आज निर्माण झाली असल्याचे सांगत डॉ. तांबे म्हणाले की, प्रत्येक राजकीय पक्षांची धोरणं वेगळी असतात. परंतु हा मतदारसंघ सामान्यांचा आहे, पदवीधरांचा आहे, सुशिक्षित लोकांचा आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत राजकारण आलेच पाहिजे असे आपणास वाटत नाही व तशीच भावना अनेक मतदारांचीही असल्याने इतर पक्षात असलेल्यांनीही आपणास सातत्याने साथ दिली आहे तशीच साथ या निवडणुकीतही पदवीधर मतदार आपला पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून सत्यजीत तांबे यांना देतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपले शिक्षण क्षेत्र खूप मोठे आहे. या क्षेत्राकडे आपण सुरुवातीपासूनच लक्ष्य दिले ही वस्तुस्थिती असल्याचे सांगताना डॉ. तांबे यांनी महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाज चिंतकांनी शिक्षणातूनच जग बदलेलं यावर वेळोवेळी भाष्य केल्याकडेही पत्रकारांचे लक्ष्य वेधले. आपल्या देशात पेट्रोल अथवा पेट्रोलियम पदार्थ व मोठ्या उद्योगांची कमतरता आहे. त्यामुळे आपल्याला उच्चस्थानी जायचे असेल तर शिक्षण हाच राजमार्ग असल्याचे ते म्हणाले. आपला देश युवकांचा आहे, त्यांच्यासाठी आपण जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
शिक्षणाचा पाया प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्यवस्थेतून रचला जातो. त्याचे मूळ जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये असून या शाळा अधिक समृद्ध करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या शाळांमधील शिक्षकांना शंभर टक्के वेतन, वेतनेतर भरपूर अनुदान, कला, क्रीडा यासारख्या विषयांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याने गेल्या दीड दशकांत आपण शाळा आणि शिक्षक यांच्या संबंधातील असंख्य विषयांसह उद्योग-धंदे वाढीसाठीचे प्रश्न किंवा सामान्य माणसाच्या आरोग्याच्या गोष्टी मांडण्याचे व्यासपीठ असलेल्या विधान परिषदेच्या सभागृहात उपस्थित करुन त्यांची सोडवणूक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे त्यांनी विविध दाखल्यांसह पत्रकारांना सांगितले.
त्या दृष्टीकोनातून मागील 13 वर्षात आपण खूप लोकांशी संपर्क केला. त्यात डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार यांच्याशी सातत्याने संवाद साधून आपण त्यांचे प्रश्न समजावून घेण्याचा व सभागृहाच्या माध्यमातून ते सोडविण्याचा सतत प्रयत्न केला. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांशी आपले वेगळे नाते निर्माण झाले असून लोकांच्या मनात पक्षीय राजकारणाच्या पलिकडे नेणारी वेगळी आस्था तयार झाल्याचे डॉ. तांबे म्हणाले. आज मतदारसंघात दिसणारी परिस्थिती अतिशय स्पष्ट असून सत्यजीत तांबे ज्या-ज्या गावांमध्ये जाताहेत तेथील शिक्षण संस्था असोत अथवा अन्य संघटना या राजकीय अभिनिवेश टाळून त्यांच्या पाठिशी खंबरपणे उभ्या रहात आहेत. त्यातून या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून सत्यजीत तांबे विक्रमी मताधिक्क्याने निवडून येतील असा ठाम विश्वासही डॉ. तांबे यांनी व्यक्त केला.
सत्यजीत तांबे उमदा तरुण आहे. त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे, अभ्यास करण्याची वृत्ती आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास करुन अथवा एखाद्या विषयाचे परिपूर्ण आकलन करुन ती मांडण्याची कला त्यांच्यात आहे. अशा तरुण नेतृत्त्वाला संधी देण्यासाठी आपण थांबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मतदार संघातील बहुतेक मतदारांना भावला आहे. सत्यजीत तांबे यांना दिलेली संधी कौटुंबिक वारसा म्हणून नव्हेतर त्यांच्यातील काम करण्याची ऊर्जा, आकलन शक्ती आणि त्यांचे भरीव सामाजिक काम पाहून नैतिकतेच्या बळावर दिल्याचेही डॉ. तांबे यांनी सांगितले.
गेल्या 13 वर्षात अहमदनगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील लोकांनी आपल्याला खूप प्रेम आणि जिव्हाळा दिला आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत हमखास बघायला मिळेल. मतदारसंघातील शिक्षकांच्या संघटना, शिक्षक भारती, टीडीएफ यासह अनेक शिक्षक, शिक्षकेतर संघटना, औद्योगिक, सामाजिक, व्यावसायिक घटक, संस्था, उद्योजक, व्यापारी या सगळ्यांच्याच विचारमूल्यांवर चालणारा तरुण म्हणून सत्यजीत तांबे यांना मोठा पाठिंबा मिळत असून त्या जोरावर ते नाशिक पदवीधर मतदारसंघात विक्रमी मतांनी विजयी होतील असा ठाम विश्वासही डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी व्यक्त केला.
सन 2009 सालापासून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करणार्या डॉ. सुधीर तांबे यांनी गेल्या 13 वर्षात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर अशा पाच जिल्ह्यातील हजारो मतदारांशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. या कालावधीत त्यांनी एकूण 14 लाख किलो मीटरहून अधिक प्रवास केला असून इतका प्रचंड प्रवास करणारा बहुधा एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. मतदार आणि आमदार यांच्यातील याच जिव्हाळ्याच्या नात्यातून सत्यजीत तांबे हे विक्रमी मताधिक्क्य घेवून विजयी होतील असा ठाम विश्वास विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना वाटतो.