श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल गुन्हेगार पकडला तब्बल वीस गुन्हे दाखल; साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात मंगळसूत्र चोरीसह इतर प्रकारचे एक दोन नव्हे तर तब्बल 20 गुन्हे करणारा आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला आहे. श्रीरामपूर शहरात पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रियाज फैयाज इराणी (वय 42, रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी, चैन स्नॅचिंग व फसवणूक असे सुमारे 20 गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्यानंतर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध सुरू होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, एक आरोपी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहे. त्यानुसार कटके यांनी पथक तयार करून शिवाजी चौकात सापळा रचला. त्यावेळी संशयित व्यक्ती तेथे आला. मात्र, पोलिसांना पाहून तो पळू लागला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याने त्याचे नाव रियाज फैय्याज इराणी असे असल्याचे सांगितले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यांची माहिती देण्यास सुरुवात केली. त्याने डिसेंबर व जानेवारीमध्ये अहमदनगर शहर परिसरात साथीदारासह चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची आणि त्यातील मुद्देमाल विकण्यासाठी आल्याची कबुली दिली. हळूहळू अन्य गुन्ह्यांची आणि साथीदाराचीही त्याने माहिती दिली. पोलिसांनी त्याच्या साक्षीदाराचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच पोलीस अधिकारी-अंमलदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, लक्ष्मण खोकले, रणजीत जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, मच्छिंद्र बर्डे व भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.