दिल्ली, मुंबईतून दिसते तशी स्थिती नाशिक मतदारसंघात नाही : सत्यजीत तांबे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा प्रचारातील सहभाग ऐतिहासिक विजय घडवणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
डॉ. सुधीर तांबे यांनी गेल्या दीड दशकांत उत्तर महाराष्ट्रातील गावागावांमध्ये थोरात-तांबे कुटुंबाचा ऋणानुबंध निर्माण केला आहे. पाच जिल्ह्यांच्या या मतदारसंघातील पदवीधर असोत, अथवा शिक्षक अशा प्रत्येक घटकाशी त्यांनी निर्माण केलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यातून आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आपल्या विजयासाठी काम करीत आहेत. दिल्ली, मुंबईत बसलेल्या नेत्यांना जमिनीवरची ही दृष्ये दिसत नसली तरीही त्यातून आपला ऐतिहासिक विजय निश्चित असल्याचा विश्वास नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला. आज नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, लासलगाव या तालुक्यात त्यांनी केलेल्या झंझावाती प्रचारादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी निफाड येथे बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, थोरात-तांबे परिवाराने संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पाचही जिल्ह्यांमध्ये जीवाभावाची माणसं उभी केली आहेत. म्हणूनच आपल्या अपक्ष उमेदवारीनंतर पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जावून सर्वच राजकीय पक्षाचे लोकं आपल्यासोबत प्रचारात सहभागी झाले आहेत, एकदिलाने काम करीत आहेत. डॉ. तांबे यांनी गेल्या पंधरा वर्षात निर्माण केलेल्या ऋणानुबंधाचे हे जिवंत उदाहरण असून हा ऋणानुबंध जोपासण्याची आणि तितक्याच ताकदीने पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली असून कार्यकर्त्यांच्या बळावर ती आपण समर्थपणे पेलू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या 15 वर्षांपासून या पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात डॉ. सुधीर तांबे यांनी जीवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले असून त्यांच्या प्रत्येक सुख-दुखःत सहभागी होणारा, त्यांच्या पाठीवर मायेचा हात ठेवणारा मित्र म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. जमिनीवरची नेमकी स्थिती आहे याबाबत दिल्ली-मुंबईत बसलेले लोक अनभिज्ञ आहेत. मात्र वास्तव हेच आहे की अगदी सामान्य माणूसही डॉ. तांबे यांच्यासाठी बाहेर पडला असून त्यानेच ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक जिंकणं हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा राहिला नसल्याचे ते म्हणाले.

या निवडणुकीच्या माध्यमातून वडिलांनी निर्माण केलेल्या ऋणानुबंधांना उजाळा देण्याचे काम आपण करीत असून मतदारांना भेटणं, त्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेणं आणि त्यांच्याशी असलेल्या नात्याची विण अधिक घट्ट करण्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क करीत आहोत. या निवडणुकीत आपल्यासाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षातील कार्यकर्ते अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आपण ऐतिहासिक विजय मिळविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासूनच सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील 56 तालुक्यांमधील पदवीधर, शिक्षक यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. गेल्या दहा दिवसांत त्यांनी हजारो मतदारांशी संवाद साधला असून त्यांच्या प्रचारात काँग्रेससह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी अशा इतर पक्षातील कार्यकर्तेही दृष्टीस पडत असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय सोपी असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *