थोरात कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री शिंदे व खासदार पवारांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मांजरी (पुणे) येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व व्हीएसआयचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जयंत पाटील, व्हीएसआयचे उपाध्यक्ष दिलीप वळसे, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजीत कदम, जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश नाईकनवरे, व्हीएसआयचे संभाजी कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि. यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरचा ऊस विकासाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे होते. उपक्रमशीलता कायम ठेवून जलसंधारण व तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना कमी पाऊस असूनही या कारखान्याने सातत्याने सभासद, कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास संपादन केला असून मागील हंगामात 15 लाख 51 हजार मेट्रीक टन टनाचे उच्चांकी गाळप करून विक्रमी भाव दिला आहे. तसेच सतत ऊस विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.

या पुरस्कार स्वीकारणेवेळी कारखान्याचे संचालक मीनानाथ वर्पे, भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, माणिकराव यादव, दादासाहेब कुटे, संभाजी वाकचौरे, भास्कर आरोटे, मंदा वाघ, मीरा वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव किरण कानवडे, शेतकी अधिकारी बी. बी. खर्डे, ऊस विकास अधिकारी बी. पी. सोनवणे आदी उपस्थित होते. याबद्दल माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, संपत डोंगरे, सत्यजीत तांबे, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात आदिंसह सभासद, ऊस उत्पादक व नागरिकांनी आभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *