आधार सेवा संकल्प अनाथालयात बेघर वृद्धास नवसंजीवनी जयवंत मोटे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून होतेय भरभरुन कौतुक


नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील आधार सेवा संकल्प अनाथालयाने बेघर झालेल्या वृद्धास आधार दिल्याने या वृद्धास जगण्यासाठी नवसंजीवनी मिळालेली आहे. आधार अनाथालयाचे प्रमुख जयवंत मोटे यांनी केलेल्या या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

नेवासा फाटा येथील रुग्णसेवक अनिल कुसाळकर यांनी जयवंत मोटे यांच्याशी मोबाइल संपर्क केला की, नेवासा फाटा येथे एक बेघर वृद्ध वाईट अवस्थेत जीवन जगत आहे. त्यास आपल्या आधार सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या अनाथालयात आधार मिळावा अशी विनंती केली. तेव्हा वडाळा बहिरोबा येथून ते नेवासा फाटा येथे वृद्ध असलेल्या ठिकाणी गेले. त्यांची विचारपूस करून अधिक चौकशी केली असता लक्षात आले की, बाबा अनाथ असून त्यांना जवळचे असे कोणीच नातेवाईक नाही. तेव्हा जयवंत मोटे यांनी या वृद्ध बाबांना वडाळा बहिरोबा येथील अनाथाश्रमात आणले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रऊफ बागवान, नजीर अली, अर्शद अली आदी उपस्थित होते. बाबांची दाढी व कटिंग केल्यानंतर त्यांना सुगंधी उटणे व साबण लावून अंघोळ घालत नवीन कपडे दिले, त्यानंतर जेवण दिले. आता काळजी करू नका बाबा मी आहे म्हणत त्यांची सेवा करण्याचा निर्धार करून बाबांना जीवन जगण्यासाठी नवसंजीवनीच दिली. यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

समाजातील दानशूरांच्या पाठबळावर सुरू असलेल्या आधार सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या अनाथाश्रमता अनेक बेघर आनंदाने राहत आहे. त्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे येवून मदत करण्यासाठी जयवंत लक्ष्मण मोटे (9503895529) यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *