महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांची संगमनेरात ‘स्टंटबाजी’! मुंबईत उपचार सुरु असलेल्या ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात प्रवेशाचा प्रयत्न..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
निवडणुकीत आपल्या नावाचा बोलबाला व्हावा यासाठी कोण काय कृती करेल याचा काही भरवसा नसतो. अशीच काहीशी घटना आज महाविकास आघाडीने पाठींबा दिलेल्या शुभांगी पाटील या संगमनेरात आल्या असता समोर आली. येथे आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना भेटण्याऐवजी ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी जात घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने साहेबांवर मुंबईत उपचार सुरु असल्याने घरात कोणीही नसल्याचे त्यांना सांगितल्यानंतरही काहीवेळ तेथेच थांबून त्यांनी नागरिकांचे लक्ष्य वेधण्याचाही प्रयत्न केला. मात्र संगमनेरकरांना वस्तुस्थिती माहिती असल्याने जवळपास पंधरा मिनिटं सुरु असलेली त्यांची ही ‘स्टंटबाजी’ त्यांना कोणताही फायदा मिळवून देवू शकली नाही. यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या असता तेथेही त्यांना गटबाजीचाच सामना बघायला मिळाला.


विविध नाट्यमय घडामोडींनंतर आधी ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आणि नंतर महाविकास आघाडीचा पाठींबा मिळालेल्या शुभांगी पाटील आज (ता.20) प्रचारासाठी संगमनेरात आल्या होत्या. गेल्या 14 जानेवारीरोजी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील काही नेत्यांचीही भेट घेतल्याचे बोलले जाते. यावेळी त्यांनी ज्येष्ठनेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यावर मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात सुरु असल्याने त्यांची भेट होवू शकली नव्हती. मात्र त्यावेळी त्यांना थोरात आजारी असल्याची आणि त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली होती.


असे असतांनाही त्या आज संगमनेरात येताच त्यांनी थेट ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या जाणताराजा मैदानाजवळील ‘सुदर्शन’ या निवासस्थानी जावून त्यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र थोरात यांच्यावर उपचार सुरु असल्याने त्यांची पत्नी व मुलगी त्यांच्यासोबतच मुंबईत असल्याने घरात कोणीही नसल्याची माहिती प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाने त्यांना दिली. त्यानंतर बराचवेळ त्यांनी सुरक्षारक्षकाला प्रवेशद्वार उघडण्याची विनवणी करण्याचा ‘स्टंट’ सुरु केला. त्यावर घरात कोणीही नसल्याने आपण प्रवेशद्वार उघडण्यास असमर्थ असल्याचे उत्तर वारंवार ‘त्या’ कर्मचार्‍याने देवूनही पाटील यांनी ते उघडण्याचा हट्ट सुरुच ठेवला.


यावेळी त्यांच्यासोबत केवळ अन्य तीन कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी मोबाईलवरुनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व वारंवार प्रवेशद्वाराच्या फटीतून सुरक्षारक्षकाशी मोठ्याने संवाद साधून रस्त्याने जाणार्‍या नागरिकांचे लक्ष्यही आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र थोरात यांच्यावर गेल्या पंधरवड्यापासून मुंबईत उपचार सुरु असल्याची माहिती संगमनेरातील अबालवृद्धांना असल्याने त्यांचा हा प्रयत्न म्हणजे निव्वळ ‘स्टंटबाजी’ असल्याचे ज्ञात व्हायला संगमनेरकरांना वेळ लागला नाही. त्यामुळे शेवटी त्या तेथून निघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोहोचल्या.


येथेही त्यांना ‘महाविकास’ आघाडीची शकलं उडून गटबाजीचे चित्र बघायला मिळाले. त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक पातळीवरील एखादा मोठा पदाधिकारी सोडा तर केवळ दोघा-तिघा शिवसेना व राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांसह काही कार्यकर्त्यांशिवाय अन्य कोणीही नसल्याचेच त्यांनी येथे अनुभवले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधीत त्यांनी येथून निरोप घेतला. त्या येथून गेल्या खर्‍या मात्र त्यानंतरही त्यांनी ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर केलेल्या ‘राजकीय स्टंट’चीच खुमासदार चर्चा सुरु होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *