दीड दशकांत डॉक्टर साहेबांनी केलेली कामे हाच आमचा पक्ष! सत्यजीत तांबे; वडिलांनी सुरु केलेल्या कामांचा झंझावात कायम ठेवणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व करताना डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जावून समाजातील सर्व घटकांसाठी भरीव काम केले. जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळापासून गुजरातच्या सीमावर्ती भागाला भिडलेल्या धडगावपर्यंत त्यांनी आपल्या स्वभावातून, वागण्यातून जमवलेली माणसं हिच आपली खरी ताकद आहे. याच जोरावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून यापुढेही आपण डॉक्टर साहेबांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून आपल्या परिवाराबाबत वेगवेगळ्या माध्यमात राजकीय चर्चा सुरु आहेत, तूर्त आपण त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही. मात्र योग्यवेळी आपण त्यावर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेल्या गोंधळानंतर गुरुवारी (ता.19) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केल्याची घोषणा केली. यानंतर तांबे त्यावर काय बोलतात याची उत्सुकता ताणली गेली असतानाच सत्यजीत तांबे यांनी त्यावर बोलणे टाळले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते पक्षीय राजकारणाचा पलिकडे जावून गेल्या दीड दशकांत त्यांच्या वडिलांनी मतदार संघात केलेल्या कामांवरच निवडणूक लढविणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आज (ता.20) सकाळी संगमनेरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देत असताना त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला.

यावेळी तांबे म्हणाले की, गेली 15 वर्षे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करताना डॉॅ. सुधीर तांबे यांनी केवळ विकासाचे राजकारण केले. त्यातून अहमदनगरसह नाशिक, धुळे, जळगाव व नंदूरबार या पाचही जिल्ह्यातील 56 तालुक्यांमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारी हजारो माणसं निर्माण झाली. जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेल्या चोंडीतील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्यापासून ते थेट गुजरातच्या सीमावर्ती भागाला खेटलेल्या धडगाव तालुक्यापर्यंतच्या गावागावातील तरुण, पदवीधर, शिक्षक, शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेली मंडळी, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी अशा सगळ्याच घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

डॉ. तांबे यांचा मृदू स्वभाव आणि त्यांच्या प्रेमळ वागण्यातून त्यांनी जमविलेली हजारो माणसं आज राजकारणाच्या पलिकडे जावून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहेत. याच पार्श्वभूमीवर आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असून डॉ. तांबे यांनी मतदार संघात रुजविलेल्या विकासाचा वारसा घेवून आपण पुढे जाणार आहोत. गेल्या 15 वर्षांत त्यांनी या पाचही जिल्ह्यातील लोकांशी ऋणानुबंध निर्माण केले आहेत, यापुढील काळात ते तितक्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आपण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितले. त्यांनी गेल्या आठ दिवसांत पाचही जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देवून मतदारांना आपली भूमिका पटवून सांगितली असून आज सकाळी संगमनेर तालुक्यातील विविध ठिकाणच्या पदवीधरांशीही त्यांनी संवाद साधला.


सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काहींनी त्यांच्या पक्षांतराबाबतही भाष्य केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज त्यांनी ‘गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेले राजकारण आपण सगळे पाहतो आहोत, आपल्याबाबत केलेले राजकारण आता पुरे झाले. यावर आपण आत्ता काही बोलणार नाही, मात्र योग्यवेळी त्याला उत्तर देवू.’ असे सांगत गेल्या 15 वर्षात डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात केलेल्या प्रचंड कामाच्या बळावरच आपण निवडणूक लढविणार असल्याचे एकप्रकारे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *