काँग्रेसच्या बाजीप्रभूंनाच ‘खिंडीत’ अडविण्याचा प्रयत्न! थोरात-तांबेंच्या योगदानाचा विसर; स्वपक्षातील नेत्यांकडूनच पक्षनिष्ठेवर शंका..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे तरुण नेतृत्त्व म्हणून राज्यात ओळख असलेल्या सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात घेतलेल्या भूमिकेने सध्या राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. पक्षाकडून त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर होवूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. हा पक्षासोबत त्यांनी केलेला विश्वासघात असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. तर, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काही नेत्यांनी सत्यजीत तांबेच्या भूमिकेचा आधार घेवून थेट काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडेच उंगलीनिर्देश करण्याची पद्धतशीर मोहीम सुरु केली आहे. मात्र त्याचवेळी थोरात आणि तांबे या दोन्ही राजकीय घराण्यांनी पक्षाला दिलेल्या योगदानाचा या सर्वांनाच सोयीस्कर विसर पडल्याचेही दिसत आहे. ज्यावेळी राज्यातील काँग्रेस मरणासन्न अवस्थेत गेली होती, त्यावेळी ज्या धुरंदराने पक्षाचे सेनापत्य स्वीकारुन खिंड लढवली, त्याच काँग्रेसच्या बाजीप्रभूंना आज खिंडीत गाठण्याचे हे षडयंत्र राज्यातील जनता सहन करेल का हा प्रश्न आहे.

महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विचारांना बांधलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मुशीतून घडलेल्या बाळासाहेब थोरात यांनी कधीही काँग्रेसच्या विचारधारेची प्रतारणा होवू दिली नाही. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांना पक्षाने तब्बल 15 वर्षांनंतर मंत्रीपदाची संधी दिली. या काळात अनेकदा काँग्रेस फुटली, त्यातून वेगवेगळे गटही निर्माण झाले. मात्र थोरातांनी कधीही गांधी परिवाराची साथ सोडली नाही. 1999 साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली त्यावेळी राज्यातील राजकीय स्थिती पेचाची बनली होती. अशा स्थितीतही थोरात परिवाराने गांधी विचारांची कास सोडली नाही.

बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने शहरातच स्थिरावल्यानंतर 1991 साली नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. अतिशय शांत, संयमी आणि प्रत्येकाशी आदराने वागणारा राजकारणी अशी त्यांची सुरुवातीपासूनची ओळख. तेव्हापासून त्यांनीही सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मेव्हणे बाळासाहेब थोरात यांच्या सोबतीने काँग्रेसच्या विचारांची पालखी सतत चालती ठेवली. नाशिक पदवीधर मतदार संघ तसा भाजपाचा बालेकिल्ला, तो भेदण्याची योजना आखून त्यांनी पाच जिल्हे आणि 56 तालुक्यांचा आवाका असलेल्या या प्रचंड मतदार संघात दिवस-रात्र परिश्रम करुन काँग्रेसचे विचार पोहोचवले. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्याने 2009 साली त्यांनीही अपक्ष उभे राहून ती निवडणूक जिंकली.

तेव्हापासून हा मतदार संघ काँग्रेसच्याच ताब्यात आहे. काँग्रेसच्या तिकीटावर विजयाची हॅट्रीक करणार्‍या डॉ. सुधीर तांबे यांनी या मतदार संघातील प्रत्येक गाव-खेड्यात आपला संपर्क निर्माण केला आहे. प्रत्येकाला भेटणारा, आस्थेवाईकपणे विचारपूस करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 13 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी या संपूर्ण मतदारसंघात असंख्य कामे केली आहेत. पदवीधरांच्या समस्या प्रभावीपणे सभागृहात मांडल्या आहेत, त्यांचा पाठपुरावा केला आहे. कामाचा प्रचंड व्याप असतानाही त्यांनी मतदारांशी असलेली नाळ कधीही कमजोर होवू दिली नाही. त्यामुळेच नाशिक पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला आहे. त्यांनी या माध्यमातून घराघरात काँग्रेसचे विचार पोहोचवण्याचे, मतदारांना त्या विचारांशी बांधण्याचे काम केले आहे. त्यांच्याच परिश्रमातून कधीकाळी भाजपाचा बालेकिल्ला मानला गेलेला हा मतदार संघ आज काँग्रेसचा बालेकिल्ला बनला आहे.

गेल्या पंचवार्षिकमध्ये राज्यातील काँग्रेस अक्षरशः लयाला गेली होती. त्या काळात काँग्रेसचे पद घेण्यासही कोणी धजावत नव्हते. पक्षातून पलायन सुरुच होते. अशावेळी या पक्षाचे नेतृत्त्व स्वीकारण्याची हिंमत संपूर्ण राज्यातून केवळ एकमेव नेत्याने दाखवली आणि तो नेता होता बाळासाहेब थोरात. सत्यजीत तांबे यांच्या भूमिकेनंतर अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी बरंही त्यांच्यावर टीकेची संधी साधली असेल. पण जेव्हा काँग्रेस अडचणीत होती, तेव्हा ही मंडळी कोठे होती? राज्याच्या जनसागरात काँग्रेस नावाचे जहाज बुडते की काय अशी स्थिती असतांना त्या जहाजाचे कप्तान होवून त्याला सावरणार्‍या, पक्षाला पुन्हा सन्मान मिळवून देणार्‍या, एकीकडे आपल्या संयमी आणि सुसंस्कृत स्वभावाने सत्ताधारी गटाचे आक्रमण थोपवणार्‍या आणि दुसरीकडे पक्षातील सहकार्‍यांना विजयाचा मार्ग दाखवणार्‍या, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत राज्य समन्वयकाची यशस्वी जबाबदारी पेलणार्‍या त्याच बाळासाहेब थोरात यांना आज ही मंडळी खिंडीत गाठू पहात आहे.

ज्या भाऊसाहेब थोरातांच्या विचारांचा वारसा घेवून बाळासाहेब थोरात कार्यरत आहेत, त्याच भाऊसाहेब थोरातांच्या अंगाखांद्यावर खेळून सत्यजीत तांबे मोठे झाले आहेत. त्यांच्यावर नेहमीच सहकारमहर्षींच्या विचारांचा पगडा राहिला आहे. राजकीय पटलावर नियमित होणारे, मात्र थोरात-तांबेंचा कार्यक्रम आहे म्हणून राज्यभर चमकवले गेलेले प्रकाशन अख्यान खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उलगडून सांगितले आहे. त्यानंतरही त्यावरुन थोरात-तांबेंना लक्ष्य करणे कितपत योग्य आहे?. भूतकाळात डोकावून बघितल्यास सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व ज्येष्ठनेते शरद पवार असो, किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व स्वर्गीय विलासराव देशमुख असोत त्यांच्यात राजकारणा पलिकडची मैत्री होती. तशाच संबंधातून देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्या’ कार्यक्रमात दाखवलेली उपस्थिती व त्यांच्या गुणांचे कौुतक हा त्या मंचाचाच भाग होता. मात्र तो धागा पकडून थेट प्रचंड राजकीय योगदान देणार्‍या, वादळातही पक्षनिष्ठेशी बांधिल राहिलेल्या थोरात-तांबे यांच्या निष्ठेवर शंका हा त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर उडवला जाणारा शिंतोडाच म्हणावा लागेल.

प्रचंड ऊर्जा असलेल्या सत्यजीत तांबे यांनी गेल्या 22 वर्षात युवक काँग्रेसच्या माध्यमातून मोठे काम करताना संघटन अधिक मजबूत बनविले आहे. ध्येयधोरणांच्या अभावाने पक्षापासून दुरावत चाललेल्या तरुणांच्या मनात आशेचा किरण निर्माण करुन आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात त्यांनी युवकांचे भक्कम संघटन निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर टीका करणार्‍या स्वपक्षातील नेत्यांसह विरोधी गटातील नेत्यांनीही त्यांच्या या राजकीय योगदानाचा विचार करण्याची गरज आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही माध्यमांच्या समोर आपण काँग्रेसच्या विचारांचे भोई असल्याचे जाहीर सांगितले आहे. आपण महाविकास आघाडीचेच प्रतिनिधीत्व करीत असून सर्व नेत्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण भाजपच्या नेत्यांनाही भेटू या त्यांच्या वक्तव्यावर तांडव करण्यासारखेही काही नाही. असे असतानाही थोरात-तांबे परिवारावर टीका करण्याचा प्रकार नाशिक पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदार सहन करतात की त्याला तसेच उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *