पंतप्रधानांकडून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंचे कौतुक! राष्ट्रीय युवा दिन; हुबळीतील कार्यक्रमात महाराष्ट्र संघाची योगासने


नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दरवर्षी साजरा होणारा ‘राष्ट्रीय युवा दिन’ यंदा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी गाजवला. कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविणार्‍या महाराष्ट्र संघाने योगासनांचे रोमहर्षक सादरीकरण करीत पंतप्रधानांसह उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली. यासोबत ध्रुवच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ओडिसी नृत्य प्रकाराने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावर्षीच्या युवा दिवस कार्यक्रमात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमानही पटकाविला.

भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विविध राज्यातील युवकांच्या सहभागाने साजर्‍या होणार्‍या या कार्यक्रमात त्या-त्या राज्यातील विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे कर्नाटकातील हुबळी येथे भारतसरकार व कर्नाटक राज्याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थीनींनी शास्त्रीय नृत्य प्रकारातील ओडिसी नृत्यासोबत योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह वेगवेगळ्या विभागांच्या मंत्री, अधिकारी, निमंत्रित व हजारो युवकांच्या उपस्थित साजर्‍या झालेल्या या कार्यक्रमात नुकत्याच संगमनेर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या महाराष्ट्राच्या योगासन संघाला राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली.

या कार्यक्रमात राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे प्रतिनिधीत्व करणार्‍या महाराष्ट्र संघात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या रुपेश सांगे, निबोध पाटील, सुमित बंडाळे, प्रीत बोरकर, प्रणव साहू, वैष्णव कोरडे, पवन चिखले, आदित्य जंगम, रुद्राक्षी भावे, गीता शिंदे, तन्वी रेडीज, स्वरा गुजर यांचा तर ओडिसी नृत्य प्रकारात वृष्टी पटेल, जीया बाफना, आदिती लाहोटी व सौम्या जोशी यांचा सहभाग होता. योग शिक्षक मंगेश खोपकर, विष्णू चक्रवर्ती यांनी योगासनपटूंना तर सोनाली महोपात्रा यांनी ओडिसी नृत्य सादर करणार्‍या विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांची विशेष तयारी करवून घेतली. या कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी व व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


पंतप्रधान, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री व अन्य मंत्रीगण यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय युवा दिनाच्या शानदार कार्यक्रमात योगासन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदित सेठ व सेके्रटरी जनरल डॉ. जयदीप आर्य यांनी महाराष्ट्राच्या योगासन संघाला राष्ट्रीय योगासन महासंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. योगासनांची रोहर्षक प्रात्यक्षिके सुरु असताना खुद्द पंतप्रधानांनी अनेकवेळा टाळ्या वाजवून मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. हा क्षण महाराष्ट्रासाठी, ध्रुव ग्लोबल स्कूलसाठी अत्यंत अभिमानास्पद असाच होता.
– डॉ. संजय मालपाणी
उपाध्यक्ष : राष्ट्रीय योगासन महासंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *