स्वामी विवेकानंदांनी तरुणाईला दिशा दिली ः जाखडी संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने स्वामी विवेकानंद जयंती साजरी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘भारताची वैश्विक बंधुभावाची संकल्पना पहिल्यांदा जागतिक क्षितिजावर ठामपणे मांडणारे आणि जगाला बंधू-भगिनींनो या प्रेमळ शब्दांची देणगी देऊन युगपुरुष स्वामी विवेकानंदांनी तरुणाईला दिशा दिली’, असे उद्गार संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी काढले.

संगमनेरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना जाखडी यांनी वरील उद्गार काढले. पुढे ते म्हणाले, ‘स्वामी विवेकानंद यांना आयुष्य कमी लाभले. पण तेवढ्या अल्पकाळात त्यांची कीर्ती सातासमुद्रापार पोचली. तरुण हा देशाचा कणा आहे हे ओळखून त्यांनी युवा वर्गाला अनमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी युवा वर्गात चेतना निर्माण झाली. युवकांना ऊर्जा मिळाली. सकारात्मक दिशा मिळाली. उठा जागे व्हा आणि आपल्याला काय मिळवायचे आहे त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु करा असा मंत्र त्यांनी दिला. बलोपासना करा, मैदानावर घाम गाळा आपली सनातन गौरवशाली परंपरा असलेली संस्कृती सर्वत्र पोचवा. राष्ट्रासाठी सर्वतोपरी योगदान द्या, असे सांगणारे स्वामीजी म्हणजे दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कर्तृत्वामुळे ते कोट्यवधी मनात अजरामर झाले आहेत.

संगमनेरमध्ये विविध क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी करणार्‍या युवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यात ओम इंदाणी, अजिंक्य उपासनी, चंदन पापडेजा, प्रभज्योतसिंग पंजाबी, चित्तरंजन कोर्टीकर, निरंजन कोर्टीकर, लायन्स क्लबचे सचिव अतुल अभंग, जितेश लोढा, विनायक तांबे, भोला सस्कर, संकेत मुळे यांचा समावेश होता. याप्रसंगी अनेक तरुणांनी आपले विचार व्यक्त करून भविष्यात कार्य वाढून समाजोपयोगी संकल्प करण्याची इच्छा व्यक्त केली. राजाभाऊ देशपांडे यांनी स्वामी विवेकानंदांचे अनेक विचार युवकांपुढे मांडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच ब्राह्मण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुधाकर क्षीरसागर, विजय नागरीचे माजी अध्यक्ष संदीप मुळे आदिंसह पुरोहित प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, विशाल जाखडी, अरुण कुलकर्णी, प्रा. सतीश देशपांडे, सागर काळे, रवीकांत तिवारी, नीलेश पुराणिक, बापू दाणी, अजित देशपांडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष संदीप वैद्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *