इस्त्राइलचे तंत्रज्ञान वापरल्यास भारतीय शेती पुढे जाईल ः डॉ. रसाळ संगमनेर महाविद्यालयात इस्त्राइल शेती तंत्रज्ञानावर व्याख्यान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भावी काळात फक्त आपला देश शेतीप्रधान आहे म्हणून चालणार नाही. विशेष करून शेतकर्यांनी शेतीच्या विकासाकडे वाटचाल केली पाहिजे. इस्त्राइलसारख्या छोट्या देशाचे अनुकरण केले तर उत्पादनात निश्चितच वाढ होईल. भारतातील शेतकर्यांना भविष्यकालीन स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर जाणीवपूर्वक शेती विषयाचे योग्य प्रशिक्षण घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. पारंपारिक शेती करत असताना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्यास उत्पादनामध्ये विक्रमी वाढ होईल. भारतीय शेतकर्यांच्या पुढे आज अनेक आव्हाने उभी टाकलेले आहेत, असे मत संगमनेर महाविद्यालयात डॉ. रामचंद्र रसाळ यांनी व्यक्त केले.
बॅरिस्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोरक्षनाथ सानप, प्रा. डॉ. नामदेव साबळे, प्रा. डॉ. सागर भिसे, प्रा. केशव गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. रामचंद्र रसाळ म्हणाले, इस्त्राइलसारख्या कमी क्षेत्रफळ असणार्या देशात एकरी दोनशे टन टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. तसेच प्रत्येक ठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जैविक खतनिर्मिती ही इस्त्राइलसारख्या छोट्या देशाने जगाला दिलेली देणगी आहे. शेतकरी सधन झाला तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. देशात होणार्या शेतकर्यांच्या आत्महत्या बंद होतील. उत्पादन खर्च कमी करून आपल्या शेतात विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर नियोजन व शेती अभ्यास या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रास्ताविक प्रा. डॉ. नामदेव साबळे यांनी केले. तसेच पाहुण्यांचा परिचय व सत्कार निवेदन डॉ. कैलास जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शरद शिरोळे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. प्रवीण केंद्रे, प्रा. डॉ. शरद थोरात, प्रा. केशव गुंजाळ आदी बहि:शाल शिक्षण मंडळ कमिटी सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.