वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानालाच ‘उपचारांची’ गरज! अधिकार्‍यांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुनही घेईना दखल


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील जवळेबाळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे निवासस्थान खोल्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणारे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानालाच आता उपचारांची गरज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पठारभागावरील जवळेबाळेश्वर येथे 14 वर्षांपूर्वी भव्य दिव्य असे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे. या अंतर्गत एकूण पंधरा गावे येतात. रुग्णांना तत्काळ आरोग्याच्या सेवा मिळाव्यात म्हणून येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना राहण्यासाठी खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. मात्र आता खोल्यांची सद्यस्थितीत दयनीय अवस्था झालेली आहे. पावसाळ्यात छत गळत असून खिडक्यांच्या काचाही फुटून गेल्या आहेत. विजेची जोडणी देखील खराब झालेली आहे. तर खोल्यांभोवती गवत वाढले आहे. अनेक समस्यांच्या विळख्यात हे निवासस्थान सापडल्याने तत्काळ ‘उपचारांची’ गरज आहे. परिणामी या खोल्यांमध्ये कर्मचारी राहत नसून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे.

यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद बांबळे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सध्या तरी एकच खोली चांगली आहे. मात्र तीही पावसाळ्यात गळत आहे. त्यामुळे सर्व खोल्यांची दुरूस्ती करावी म्हणून संबंधित विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तरी संबंधित विभागाने या खोल्यांची दुरूस्ती करावी अशी मागणीही आता यानिमित्ताने जोर धरु लागली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारीच जंगल
जवळेबाळेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अवतीभोवती जंगल आहे. त्यातच या खोल्यांच्या खिडक्यांच्या काचाही काही महिन्यांपासून फुटल्या आहेत. त्यामुळे आतमध्ये सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तातडीने दुरूस्ती होण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *