सत्यजित तांबे यांनी भाजपाची उमेदवारी केल्यास त्यांचे स्वागत! अवघे काहीतास शिल्लक; महसलूमंत्री विखेंच्या विधानाने पुन्हा वातावरण ढवळले..


नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोणाला उमेदवारी द्यावी याचा सर्वस्वी निर्णय केंद्रीय समितीच्या हाती असतो, मात्र युवानेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी भाजपाकडून उमेदवारी केल्यास त्यांचे स्वागतच आहे असे सूचक विधान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डीत केले. एकीकडे पदवीधर मतदार संघातील भाजपा उमेदवारावरुन वेगवेगळे तर्क लढविले जात असतांना भाजपाच्या पहिल्या फळीतील नेत्याच्या सूचक वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळले असून यावेळी त्यांनी काहीतरी चमत्कार घडणार असल्याचे सांगत पत्रकारांनाही बुचकळ्यात टाकले आहे.


मागील तरा वर्षांपासून काँग्रेसच्या हाती असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात विद्यमान सदस्य डॉ.सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ते आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी नाशिककडे रवानाही झाले आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाकडून मात्र अद्यापही कोणत्याही नावाची घोषणा नसल्याने राज्यातील राजकीय जाणकारांसह सर्वसामान्यांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज शिर्डीत आलेल्या महसूलमंत्री विखे पाटील यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलते करण्याचा प्रयत्न केला.


यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना बगल देत मार्मिक उत्तरे देतांना त्यांनी उमेदवारी कोणी करायची याचा निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठी करतात. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अवघे काहीतास शिल्लक आहेत. एकंदरीत घडामोडी पाहता नाशिकमध्ये काहीतरी चमत्कार घडणार असल्याची शक्यता दिसत असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित सर्वांचीच उत्कंठा वाढवली. त्यांच्या या विधानावर पत्रकारांनी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी ‘चमत्कार करण्याचे काम पक्षश्रेष्ठींचे असते, आणि त्याची परिपूर्ती करण्याचे काम आम्ही करतो’ असे सूचक विधान करीत पुन्हा पत्रकारांना बुचकाळ्यात पाडले.


यावेळी त्यांना डॉ.राजेंद्र विखे उमेदवारी करणार आहेत का? असा सवालही विचारण्यात आला. त्यावर आपणास अशी माहिती नसल्याचे सांगत एकप्रकारे त्यांनी राजेंद्र विखे या निवडणुकीत नसल्याचेच सांगून टाकले. याचवेळी त्यांनी सत्यजित तांबे यांनी भाजपाची उमेदवारी केल्यास त्यांचे स्वागतच असल्याचे सांगत राजकीय जाणकारांच्या विचारात आणखी कालवाकालव केली. त्यामुळे शिल्लक राहीलेल्या पुढील दीड तासांत नाशिकमध्ये काय धडामोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचे लख्य लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *