नाशिक पदवीधर मतदार संघात आता नवा राजकीय ‘ट्विस्ट’! काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची एन्ट्री; तांबे कुटुंबाने परस्पर सहमतीने उमेदवार ठरवावा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस उजेडूनही या मतदार संघात निर्माण झालेले संभ्रमाचे धुके अद्यापही हटलेले नाही. नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपाकडून राजकीय खेळी होण्याची शक्यता गृहीत धरुन मंगळवारी (ता.10) दैनिक नायकने याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने समोर आणलेल्या तथ्यांची दखल घेत गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांमध्ये राजकीय तर्क-विर्तकांचा अक्षरशः धुरळा उडत असतांना आता त्याचे लोळ थेट राजधानी दिल्लीत पोहोचले असून राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी रात्री थेट डॉ.सुधीर तांबे यांच्याशी संपर्क साधून नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवार परस्पर सहमतीने ठरविण्याची मुभा दिल्याचे वृत्त विश्‍वसनीय सूत्रांच्या हवाल्याने एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय शक्यतांनी राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे.


राजकीय खेळी करण्यात माहीर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 7 डिसेंबररोजी मुंबईतील एका कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेल्या माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समोरच युवानेते सत्यजित तांबे यांच्या कामाचे मोठे कौतुक केले होते. यावेळी बोलतांना त्यांनी सत्यजितसारख्या उमद्या तरुणांना योग्यवेळी राजकारणात संधी मिळायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करतांना सत्यजितसारख्या चांगल्या लोकांवर आमचीही नजर असल्याचे सांगत राजकीय विश्‍लेषकांचे ओठ दातांखाली आणले होते.


त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच 29 डिसेंबररोजी हिवाळी अधिवेशनाच्या समारोपा वेळीही विधान परिषदेची मुदत संपलेल्या सदस्यांना निरोप देतांना त्यांनी पुन्हा एकदा थेट सभागृहात या विषयावर भाष्य केले. त्यामुळे राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलेले असतांना त्यांच्या वक्तव्याचे पडसाद थेट नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही उमटल्याचे दिसून आले. त्यातून गेल्या 13 वर्षांपासून या मतदार संघात प्राबल्य असलेल्या आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांना उमेदवारी मिळावी अशी चर्चा सुरु झाली. या दरम्यान डॉ.तांबे यांनी पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघातील आपले काम सुरुच ठेवल्याने काहीसा संभ्रमही निर्माण झाला होता.


एकीकडे सत्यजित तांबे यांना संधी मिळावी असा एक मतप्रवाह समोर आलेला असतांना दुसरीकडे कॉग्रेसच्या गोटातून मात्र शेवटच्या क्षणापर्यंत डॉ.सुधीर तांबे यांचेच नाव समोर येत गेल्याने व त्यातच कधीकाळी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात त्यांच्या उमेदवारीची घोषणाच खोळंबल्याने राजकीय तर्कांना मोठा वाव मिळाला. त्यामुळे फडणवीसांनी दोनवेळा केलेले कौतुक आणि सत्यजित तांबेंना संधी देण्यासाठी धरलेला आग्रह त्यांना भाजपची उमेदवारी मिळवून देईल असेच वातावरण तयार झालेले असतांना दैनिक नायकच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात राजकीय चर्चांचा धुरळा उडाला.


संगमनेरसारख्या एका ग्रामीण शहरातून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक नायकसारख्या स्थानिक वृत्तपत्राने मांडलेल्या या राजकीय सारीपाटाची दखल काही वेळातच राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनाही घ्यावी लागली. त्यातून गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक चर्चेत आलेली असतांना बुधवारी (ता.11) काँग्रेसने डॉ.सुधीर तांबेंच्या नावाची घोषणा करुन सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही भाजपाने आपला उमेदवार पडद्याआडच ठेवल्याने व त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी ‘नाशिक पदवीधर मतदार संघ शिक्षकांचा आहे, तेथे भाजपाने कधी प्रयत्न केला नाही. मात्र नाव निश्‍चित असलेल्या अपक्ष उमेदवाराला आम्ही पाठींबा देण्याचा निर्णय घेतोय’ असे सूचक मात्र संभ्रम करणारे वक्तव्य केले.


त्यातून भाजपाने अद्यापही या मतदार संघातील खेळी बंद केली नसल्याचे स्पष्ट झाले असून मुक्काम पोस्ट सावेडी, अहमदनगर असा पत्ता असलेल्या सत्यजित तांबे यांनी उमेदवारीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यापूर्वीच जुळवाजुळव केल्याची माहितीही एका वृत्तवाहिनीने दिली. यासर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आत्तापर्यंत केवळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसने आता कोठेतरी या वातावरणाची दखल घेतली असून बुधवारी (ता.11) रात्री उशीराने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डॉ.सुधीर तांबे यांच्याशी संपर्क साधला असून ‘तुम्ही तुमच्या परस्पर सहमतीने उमेदवार ठरवा’ अशी सूचना केल्याचे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिले आहे.


त्यानुसार एकतर ऐनवेळी काँग्रेसकडून डॉ.सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल होईल किंवा भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या वक्तव्यानुसार ते अपक्ष उमेदवारी दाखल करुन भाजपाचा पाठींबा मिळवतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र अशी स्थिती निर्माण झाल्यास डॉ.तांबे काय भूमिका घेतील याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतरही सत्यजित तांबे यांना विरोधी बाकांवरच बसावे लागेल, त्यामुळे ते सत्तेचा हात धरतात की मामांच्या निष्ठेच्या पालखीचे भोयी होतात याकडे अवघ्या नाशिक पदवीधर मतदार संघाचे लक्ष्य लागले आहे. काही वेळातच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या फोनने नाशिक पदवीधर मतदार संघातील राजकारणात नवा ‘ट्विस्ट’ आला आहे. त्यामुळे एकीकडे स्वपक्षाकडून तिकीटं मिळवून विधान परिषद गाठायची की अपक्ष अथवा थेट भाजपकडून तिकीटं मिळवून एखादी मोठी जबाबदारी मिळवून आपल्यातील ‘कर्तृत्त्व’ सिद्ध करायचे असे दोन पर्याय सत्यजित तांबे यांच्यासमोर आहेत. त्यातील एक निवडून ते पुढील मार्गक्रमण करतील असे अपेक्षीत असले तरीही ऐनवेळी काय घडेल याबाबत मात्र कोणतीही शाश्‍वती नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *