स्ट्रॉबेरीमध्ये विद्यार्थ्यांनीच घेतली पत्रकारांची मुलाखत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पत्रकार दिन केला साजरा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘पत्रकार दिन’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून ते पत्रकारांच्या मुलाखतीपर्यंत सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांनी पार पाडले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार ओळखले जातात. अशा पत्रकारांना आपल्या विविध उत्स्फूर्त प्रश्नांद्वारे बोलते करून माध्यमांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी 1832 साली त्यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. स्थानिक विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार आणि स्थानिक वृत्तवाहिनीचे संचालक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ लेखक, आकाशवाणीचे पहिले वृत्तनिवेदक, माध्यमतज्ज्ञ, संपादक आणि रंगकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे (वय 84) यांचे मुंबईत निधन झाले. त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्कूलच्या अध्यक्षा डॉ. संज्योत वैद्य यांनी मान्यवर पत्रकारांचा सत्कार केला. दैनिक नायकचे पत्रकार, सी-न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे, संचालक व संपादक, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ नेहे आणि सी न्यूज वृत्तवाहिनीचे संचालक बाळासाहेब गडाख यांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली.

स्ट्रॉबेरीच्या कट्ट्यावर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांनी पत्रकारिता क्षेत्रासंदर्भात विविध प्रश्न विचारून उत्तरे जाणून घेतली. उत्कृष्ट प्रश्न विचारणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. सामाजिक कार्याची मुळातच आवड असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची दखल घेता यावी यासाठीच पत्रकारिता क्षेत्र निवडल्याचे सांगत, पत्रकार म्हणून काम करताना जीवाची परवा न करता निडरपणे काम करण्यास आवडते असे मत पत्रकारांनी व्यक्त केले. आजच्या ई-पत्रकारितेबद्दल प्रश्न विचारले असता, प्रिंट मीडिया अविरतपणे काम करत असल्याचे सांगितले. वृत्तपत्रांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. कारण ज्या बातम्या अतिशय कमी वेळात ताबडतोब ई-पत्रकारितेतून मिळत असतात त्यांची सविस्तर व सखोल माहिती वृत्तपत्रांतून मिळत असल्याचे नमूद केले. नवोदित पत्रकारांना आपण काय संदेश देऊ इच्छिता विचारले असता, त्यांनी उत्तर दिले की नवोदित पत्रकारांनी अविरत कष्ट करून व समाजाच्या हिताचे भान ठेवून काम करावे. या कार्यक्रमास प्राचार्य, उपप्राचार्या, अकॅडेमी, हेड शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *