सत्यजीत तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार? फडणवीसांनंतर आता शिंदेंचेही सूचक विधान; ऐनवेळी नावाची घोषणा होण्याची शक्यता..


श्याम तिवारी, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे 48 तास शिल्लक आहेत. मात्र असे असतानाही या मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होवूनही त्यांनी अद्यापही आपला अर्ज दाखल केलेला नाही. त्यातच कधीकाळी भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या या मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार कोण? याबाबत अजूनही अनेक नावे समोर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्यजीत तांबेंना ‘संधी’ देण्याबाबत दोनवेळा झालेल्या वक्तव्यानंतर आता माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या ‘नवीनच कोणीतरी असेल’ या वक्तव्याने पाच जिल्ह्यांच्या या मतदारसंघातील अडीच लाखांहून अधिक पदवीधर मतदारांची उत्कंठा आकाशी भिडली आहे. गेल्या चोवीस तासांत सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांचे सोशल ‘डीपी’ आणि ‘स्टेट्स’ही अत्यंत बोलके असून त्यातून नाशिक पदवीधर मतदारसंघातून त्यांची विधान परिषदेत ‘एन्ट्री’ होणार असेच काहीसे सुप्त वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार प्रतापदादा सोनवणे 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांच्या राहिलेल्या अवघ्या 11 महिन्यांच्या कालावधीसाठी निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत काँग्रेसशी बंडखोरी करीत डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बलाढ्य पाठबळासह आपली स्वतःची सक्षम प्रचार यंत्रणा आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नितीन ठाकरे यांच्यासह भाजपा उमेदवार डॉ. प्रशांत हिरे यांचा पराभव करीत त्यांनी विजय मिळवला. त्यानंतर वर्षभराने 2010 साली झालेल्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. तेव्हापासून या मतदारसंघात त्यांचे प्रभुत्त्व कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसने सलग तिसर्‍यांदा त्यांना उमेदवारी जाहीर केली.

गेल्या 5 जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होवून निवडणूक प्रक्रियेलाही सुरुवात झाली. त्यात तत्पूर्वीच काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने डॉ. सुधीर तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात आता उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे 48 तास उरलेले असतानाही त्यांच्याकडून अशी कोणतीही हालचाल दिसत नसल्याने अहमदनगरसह नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघातील राजकीय उत्कंठा ताणली गेली आहे. प्रत्यक्षात डॉ. तांबे यांच्या निकटवर्तीयांकडून येत्या एक-दोन दिवसांत उमेदवारी दाखल होईल अशी सारवासारव केली जात असली तरीही दुसर्‍या गोटातून मात्र काहीतरी वेगळेच शिजत असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील अन्य पदवीधर मतदार संघातील निवडणुकांचे वातावरण तापलेले असताना नाशिक मतदारसंघात मात्र संभ्रमाचे धुके पसरल्याचेच चित्र बघायला मिळत आहे.

गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात युवा नेते सत्यजीत तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटिझनविल’ या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन झाले. त्यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावर उपस्थित असलेल्या माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून ‘सत्यजीतसारखी चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे’ असे सांगत ‘हिर्‍याला किती दिवस झाकून ठेवणार?’ असा सवाल करीत ‘नाही तर आमचे अशा चांगल्या लोकांवर नेहमीच लक्ष असते’ असे सूचक वक्तव्य केले होते. त्यांच्या त्या विधानाने त्यावेळीच राज्यातील राजकीय वातावरण ढवळूनही निघाले. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना विचारलेल्या प्रश्नावर सत्यजीत तांबे यांनीही ‘विधानसभा लढवणार, मात्र मामांच्या विरोधात नाही’ असे सांगत राजकीय विश्लेषकांच्या डोक्याला झींग आणली होती.

त्यातच गेल्याच महिन्यात विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप करताना 7 फेब्रुवारी रोजी मुदत संपत असलेल्या विधान परिषद सदस्यांना निरोप देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सत्यजीत तांबे यांच्या नावाचा थेट सभागृहातील भाषणातूनच आग्रह धरला. यावेळी सभागृहातून निवृत्त होत असलेल्या डॉ. सुधीर तांबे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कामांचे भरभरुन कौतुक करताना आपण जोरदारपणे नाशिक पदवीधर मतदारसंघात उतरता आणि आपल्या प्रचंड कामामुळेच या मतदारसंघातील पदवीधर मतदार आपणास पसंदी देतात. आता आपल्या सुपुत्रांनाही कोठेतरी वाव मिळेल अशा प्रकारची ती व्यवस्था असल्याचे थेट विधान करताना ‘मी आपणास निवृत्त नाही करीत’ अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी त्यावेळी केली होती. एकाच महिन्यात दोन-दोनवेळा त्यांच्याकडून सत्यजीत तांबेंच्या नावाचा हा आग्रह खूप काही सांगणारा आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची दिशा ठरवणाराही होता.

मात्र त्या उपरांतही तांबे कुटुंबाकडून उघडपणे कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे एकीकडे भाजपाच्या राज्यातील प्रधान नेतृत्त्वाकडून दोनवेळा खुली ‘ऑफर’ मिळाल्यानंतरही त्यावर तांबे कुटुंबाची ‘चुप्पी’ न बोलताही अनेक गुपितं उलगडणारी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. सोमवारी (ता.9) माजी मंत्री व फडणवीसांच्या अत्यंत निकटचे सहकारी मानल्या जाणार्‍या प्रा. राम शिंदे यांचे विधानही सध्या भलतेचे चर्चेत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी नाशिक पदवीधरच्या उमेदवाराबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सुरुवातीला धनंजय वीसपुते, डॉ. राजेंद्र विखे, मीनाक्षी पाटील यांची नावे घेतली असली तरीही त्यांचा शाब्दिक जोर मात्र या तीनपैकी एक होईल किंवा नवीनच कोणाचे तरी नावं समोर येईल यावरच अधिक असल्याचे दिसून आल्याने त्यातूनही सत्यजीत तांबे यांच्या नावाने सुरु असलेल्या चर्चेला एकप्रकारे बळ मिळाले आहे.

भाजप हा पाच वर्ष पुढे चालणारा पक्ष समजला जातो. डॉ. सुधीर तांबे यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठी ताकद निर्माण केली आहे. एकूण 2 लाख 58 हजार पदवीधर मतदार असलेल्या या मतदारसंघातील सर्वाधिक मतदारांची नोंदणीही अहमदनगर जिल्ह्यात आणि त्यातही संगमनेर तालुक्यातून करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे तांबेंशी लढत देवून हा मतदारसंघ ताब्यात येणार नाही हे फडणवीस जाणून असल्यानेच त्यांनी वेगळी राजकीय खेळी करताना सत्यजीत तांबे यांच्या प्रचंड राजकीय महत्त्वकांक्षांना हवा देण्याचे काम केले असून त्याची परिणीती काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होवूनही अद्याप विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडून अर्ज दाखल न होण्यात झाल्याचे राजकीय जाणकार मानत आहेत.

सन 2007 आणि 2012 अशा सलग दोनवेळा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेल्या सत्यजीत तांबे यांना मात्र अद्यापही शीर्ष नेतृत्त्व करण्याची संधी मिळालेली नाही. 2007 साली विखेंच्या राजकीय खेळीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी हुकल्यानंतर 2012 साली उपाध्यक्षपदाची त्यांची संधीही चुकली होती. गेल्या दोन दशकांपासून सक्रीय राजकारणात असूनही त्यांना योग्य संधी मिळत नसल्याने भाजपाच्या माध्यमातून ते आपली राजकीय महत्त्वकांक्षा तडीस नेण्याची शक्यताही या निमित्ताने प्रकर्षाने समोर आली आहे. त्यातच सध्या भाजपाकडेही रोहित पवार व अमोल कोल्हे यांच्यासारख्या तरुण मराठा चेहर्‍यांना तोड देणारे दुसरे मराठा नेतृत्त्व नसल्याने सत्यजीत तांबे यांच्या माध्यमातून त्याची चाचपणी सुरु असल्याचीही चर्चा आहे.

राजकीय वातावरण लक्षात घेवून डॉ. सुजय विखे यांनी आई-वडील काँग्रेसमध्ये असतानाही भाजपाकडून नगर दक्षिणची लोकसभा लढवली होती. त्यानंतरही राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी तर आई शालिनी विखे पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कायम होत्या. तशाच पद्धतीची खेळी सध्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातून दृष्टीस पडत आहे. डॉ. सुधीर तांबे यांना या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली असली तरीही ऐनवेळी भाजपाकडून सत्यजीत तांबे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुलाच्या विरोधात निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी दाखल करण्यास नकार दिल्यास आश्चर्य वाटू नये. त्यातून ते काँग्रेसमध्येच राहून नगरपालिकाही ताब्यात ठेवतील असेच काहीसे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

एकीकडे उमेदवारी जाहीर होवूनही डॉ. सुधीर तांबे यांच्याकडून उमेदवारी दाखल होत नसल्याने राजकीय उत्कंठा वाढलेली असतांनाच सत्यजीत तांबे यांच्या समर्थकांच्या सोशल अकाऊंटवरील ‘व्हॉटसअ‍ॅप’चे ‘डीपी’ आणि ‘स्टेट्स’ पाहता यंदाच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काहीतरी राजकीय घाट शिजत असल्याचा वास येवू लागला आहे. गुरूवारी 12 जानेवारी रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती आहे, याच दिनाचे औचित्य साधून सत्यजीत तांबे यांचा भाजपा प्रवेश झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असेच चित्र या सर्व घडामोडींवरुन दिसत आहे, मात्र या सर्व गोष्टींना अद्यापही अधिकृतपणाचे कोंदण नसल्याने ठामपणे काहीही स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *