पदवीधरसाठी भाजपसह काँग्रेसकडूनही ‘वेट अँड वॉच’! उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उरलेत अवघे तीन दिवस..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीन दिवस उरले आहेत. काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचे ठरले असले तरी त्यांनीही अद्याप उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. तर दुसरीकडे भाजपचा मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडूनही अर्ज दाखल करण्यासाठी थांबा आणि पाहा, धोरण सुरू असल्याचे दिसून येते.

सलग तीनवेळा या मतदारसंघातून आमदार असलेले काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांची मुदत संपत आल्याने 30 जानेवारी रोजी या मतदारसंघात निवडणूक होत आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजप व शिंदे गट यांच्याकडून विधान परिषदेची ही जागा पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र, त्यांच्याकडून अद्याप उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. सुरवातीच्या काळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाला, तेव्हापासून त्यांचे नाव मागे पडले आहे. नाशिकमधून डॉ. प्रशांत पाटील, केव्हीएन नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक हेही इच्छुक आहेत. पक्षाकडून अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही.

अशातच अहमदनगर शहरातील तरुण कार्यकर्ते धनंजय जाधव यांनी उमेदवारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली आहे. जाधव पूर्वी काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांची पत्नी सध्या नगरसेवक आहे. पूर्वी काँग्रेसचे म्हणजेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व डॉ. तांबे यांचे समर्थक असलेले जाधव आता विखे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाला विखे पाटील यांचाही पाठिंबा असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंख्या लक्षात घेता काँग्रेसप्रमाणेच भाजपचा उमेदवारही जिल्ह्यातील तोही तरुण असावा, असा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र, जाधव यांच्या उमेदवारीवरही अद्याप निर्णय झालेला नाही. जाधव यांना उमेदवारी मिळालीच तर ज्येष्ठ विरूद्ध तरूण उमेदवार असा सामना रंगणार आहे.


दुसरीकडे, काँग्रेसचा उमेदवार निश्तिच असूनही त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करण्यासाठी बर्‍यापैकी मुदत असल्याने ते थांबले असावेत. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील अन्य पक्ष आणि काँग्रेसप्रणित शिक्षक आणि इतर संघटनांचाही पाठिंबा असणार आहे. तरीही भाजपकडून तरुण उमेदवार दिल्यास काही गणिते बदलणार का? याची चाचपणी काँग्रेसकडून सुरू असल्याचे समजते. पूर्वी भाजपकडे असलेला हा मतदारसंघ डॉ. तांबे यांनी खेचून आणला आणि राखून ठेवला. अहमदनगरसह सर्वच जिल्ह्यात मतदार नोंदणीपासून मतदान घडवून आणण्यासाठी यंत्रणा राबविण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांचे पुत्र काँग्रेसचे तरुण नेते सत्यजीत तांबे यांनी प्रचार आणि नियोजनाची धुरा सांभाळली आहे. यावेळीही त्यांच्यासाठी गणिते अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच भाजप सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे सांगण्यात येते.

अहमदनगर जिल्ह्यावर विजयाची गणिते…
नाशिक पदवीधर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 1 लाख 16 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. तर नाशिकमध्ये 66 हजार 709 मतदार आहेत. पाचही जिल्ह्यांत मिळून 2 लाख 58 हजार मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्याला महत्त्व येणार आहे. शिवाय जिल्ह्यात संगमनेरमध्ये सर्वाधिक 29 हजार 624 तर त्या खालोखाल 15 हजार 354 मतदार राहाता तालुक्यात आहेत. नगर शहरात 10 हजार 288 मतदार आहेत. त्यामुळे संगमनेर आणि राहाता तालुके निकालात निर्णायक ठरणार आहेत. तर जिल्ह्यांमध्ये अहमदनगर आणि नाशिक यांच्यात स्पर्धा होईल, असे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *