घरकुल लाभार्थ्यांच्या गृहभेटीसाठी समित्या गठीत 15 फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात 15 फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के घरकुले पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पंचायत समितीचे श्रेणी एक ते शिपाई यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. दर बुधवारी घरकुल लाभार्थ्यांच्या घराला भेट देऊन आढावा घेतला जात आहे. कोणत्याही परीस्थितीत मंजूर केलेले घरकुल पूर्ण करण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मंजूर सुमारे 21 कोटी रूपये खर्च होतील. संगमनेर तालुक्यात गेल्या पाच वर्षात 7 हजार 773 घरकुलांसाठी 93.50 कोटी रूपये खर्च होणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या व राज्य सरकारच्यावतीने देशातील घर नसलेल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान आवास योजनेत सन 2016-17 ते 2020-21 मध्ये एकट्या संगमनेर तालुक्यात 7 हजार 773 घरकुले मंजूर करण्यात आली आहे. त्यातील पंतप्रधान आवास योजनतील 5 हजार 540 तर राज्य सरकारच्या रमाई आवास योजनेतील 2 हजार 233 घरकुलांचा समावेश आहे. प्रत्येक घरकुलसाठी सरकार एक लाख वीस हजार रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना चार हप्त्यात देत आहे. कामे वेगाने पूर्ण व्हावीत म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून याकामी सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, अधीक्षक राजेश तिटमे, विस्तार अधिकारी सुनील माळी, सदानंद डोखे, राजेंद्र ठाकूर, राजेंद्र कासार विशेष प्रयत्न करत आहे.

संगमनेर तालुक्यात गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारच्यावतीने 7 हजार 773 घरकुलांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 5 हजार 540 घरकुल मंजूर झाले होते. त्यातील 4 हजार 70 घरकुले पूर्णत्वाला गेले आहेत. तर रमाई आवास योजनेतील 2 हजार 223 घरकुलांपैकी 1 हजार 633 घरकुले पूर्ण झाली आहेत. येत्या 15 फेब्रवारीपर्यंत उर्वरीत घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र आढावा कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार दर बुधवारी पंचायत समिती स्तरावरील श्रेणी एकचे, वर्ग दोनचे 10 अधिकारी व वर्ग तीन व चारचे सुमारे 169 कर्मचारी यांचे स्वतंत्र गट तयार करण्यात आले असून त्यांना गावे वाटून देण्यात आली आहे. त्यांचा गट प्रत्येक लाभार्थ्यास भेटून कामाचा आढावा घेत आहे. जेथे समस्या आहे तेथे तत्काळ सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे कोणताही निधी परत जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

संगमनेर तालुक्यातील 144 गावांपैकी 136 गावांत घरकुले देण्यात आली असून 96 गावांतील घरकुलांची कामे बाकी आहेत. 1460 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. 703 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, 446 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता आणि 175 लाभार्थ्यांना चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे. पहिला हप्ता पंधरा हजार, दुसरा हप्ता पंच्चेचाळीस हजार, तिसरा हप्ता चाळीस हजार आणि चौथा हप्ता वीस हजार रुपये दिला जात आहे. नागरीकांनी अधिकाधिक सहकार्य करून मंजूर केलेली घरकुले पूर्ण करावीत.
– भाग्यश्री शेळके (विस्तार अधिकारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *