कृषी पदवीधरांच्या माध्यमातूनच ग्रामीण भारताचा विकास ः डॉ. काकोडकर महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभ उत्साहात


नायक वृत्तसेवा, राहुरी
कृषी पदवीधरांच्या माध्यमातूनच ग्रामीण भारताचा विकास होवू शकतो. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, त्याचा प्रसार, नवीन तंत्रज्ञान मिळण्यासाठी आवश्यक वातावरण कृषी पदवीधरच निर्माण करु शकतात, असे प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभामध्ये दीक्षांत भाषणात डॉ. काकोडकर बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी ऑनलाइन अध्यक्षस्थानी होते. प्रतिकुलपती व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव प्रमोद लहाळे उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शेतकर्‍यांनी फर्टिलायझरचा अतिवापर न करता सेंद्रीय पीक पद्धती अवलंबून शेती करावी. माती परीक्षण करून शेती करावी. मत्स्य व्यवसायाद्वारे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढविता येवू शकते. कृषी विद्यापीठ चांगले कार्य करत असल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. कृषिमंत्री सत्तार म्हणाले, शेतकर्‍यांच्या जीवनमानात कशी सुधारणा करता येईल, ही मोठी जबाबदारी नव्या पदवीधरांवर आहे. कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचा संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचा अहवाल सादर केला. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, माजी कुलगुरू, माजी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते


डॉ. चारुदत्त मायी व पोपटराव पवार यांना मानाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. सोबत 62 पीएचडी, 382 पदव्युत्तर पदवी व 6388 कृषी पदवी असे एकूण 6834 पदवी प्रदान करण्यात आल्या. अपूर्वा वामन या विद्यार्थिनीने बीएस्सी. कृषी पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून पाच सुवर्णपदके पटकाविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *