साकूरमधील राजकीय वादातून आता थेट सरपंचाच्या घरावरच हल्ला! सुभाष खेमनरांसह सतरा जणांवर गुन्हा; अ‍ॅट्रोसिटी व विनयभंगाच्या कलमांचाही समावेश..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात पार पडलेल्या साकूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून तेथील दोन गटांमध्ये उफाळलेला राजकीय वाद दिवसोंदिवस उग्र होत आहे. त्यातून नववर्षाच्या दिनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता या घटनेला जबाबदार असलेल्या गटाचे समर्थन केले म्हणून विरोधी गटातील जमावाने साकुरच्या विद्यमान सरपंचाच्या घरावरच हल्ला चढवला. यावेळी हल्लेखोर जमावाने नूतन सरपंचासह त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत तेथे जमलेल्या महिलांचा विनयभंगही केला. त्यावरुन विरोधी गटाचे प्रमुख, निवृत्त कृषी अधिकारी सुभाष बाजीराव खेमनर यांच्यासह सतरा जणांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अ‍ॅट्रोसिटी) विनयभंगाच्या कलमांनुसार घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने साकूरमधील वातावरण पुन्हा तापले असून हा राजकीय वाद कोठवर जाणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


याबाबत साकूरमधील एका 30 वर्षीय महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार साकूरमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तेथील प्रतिष्ठीत नागरिक व उपसरपंच शंकर खेमनर व इंद्रजीत खेमनर यांचे समर्थन करण्यासाठी व त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांबाबत निवेदन देण्यासाठी मंगळवारी (ता.3) दुपारी सव्वातीन वाजता साकूरचे नूतन सरपंच सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील काही नागरिक व महिला संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांच्या कार्यालयात आले होते. त्या सर्वांनी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांची भेट घेवून आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सोपविले व त्यानंतर तेथून ते सर्वजण सायंकाळी साडेसात वाजता माघारी साकूरला पोहोचले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी बुधवारी (ता.4) सायंकाळी साडेसात वाजता सरपंच राहत असलेल्या वस्तीवरील फिर्यादीसह अन्य महिला घरातील कामकाज करीत असताना विरोधी गटाचे सुभाष बाजीराव खेमनर (निवृत्त कृषी अधिकारी), बुवाजी भागा खेमनर, किशोर बाजीराव खेमनर, इसहाक अब्दुल पटेल, विश्वजीत सुभाष खेमनर, बबलू उर्फ आदिक बाळासाहेब शेंडगे व सद्दाम मन्सूर चौगुले (सर्व रा. साकूर) यांच्यासह अन्य 9 ते 10 अनोळखी इसम त्यांच्या वस्तीवर आले. यावेळी त्या सर्वांनी वस्तीवर असलेल्या महिलांना उद्देशून ‘तुम्ही आमच्या विरोधात निवेदन देण्यासाठी संगमनेरला का गेलात?, माध्यमांना मुलाखती का दिल्या?’ असा सवाल करीत; ‘***** ***** तुम्ही जरा जास्तच माजला आहात, तुमची संपूर्ण ***** आत्ताच्या आत्ता जाळून टाकू’ असे म्हणत दमबाजी करु लागले.

या गदारोळाच्या आवाजाने आसपासच्या वस्तीवरील माणसंही तेथे मोठ्या प्रमाणावर जमा झाली. यावेळी त्या लोकांनी व सरपंच सचिन सोनवणे यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता विरोधी जमावाने त्यांच्यासह अन्य लोकांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी सरपंच सोनवणे यांना ‘तुम्ही गावचा कारभार कसा करता तेच बघतो’ अशी धमकीही देण्यात आली. या उपरांतही या सर्वांनी तेथे जमलेल्या वस्तीवरील अनुसूचित जातीच्या नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ सुरुच ठेवून ‘गावातील तुमची *** जातच नष्ट करुन टाकू’ अशी वल्गनाही केली. यावेळी अंगावर धावून आलेल्या जमावाचा रोष पाहून वस्तीवरील महिला व नागरिकांनी घरात धाव घेतली, यावेळी काहींनी सरपंच सोनवणे यांनाही घरात नेले.

त्यातून वाद संपेल असे वाटत असतानाच जमावाने थेट वस्तीवरील घरांमध्ये शिरुन अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ करीत वाद नकोत म्हणून घरात गेलेल्या महिला व पुरुषांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत नूतन सरपंचांनाही जमावाने सोडले नाही. या कृत्यानंतर जमावाने काही महिला व पुरुषांना ओढीतच घराबाहेर आणले व पुन्हा जातीवाचक शिवीगाळ सुरु केली. यावेळी जमावातील काहींनी येथील महिलांचे कपडे फाडीत अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जमलेल्या अन्य लोकांच्या समूहासमोर वारंवार जातीवाचक उल्लेख करुन त्या सर्वांचा अपमान केला. जवळपास अर्धातास चाललेल्या या प्रकारानंतर गावातील काही मंडळींनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांच्या जमावाने जाता जाताही फिर्यादी महिला, त्यांचे कुटुंबीय व वस्तीवरील अन्य महिला व नागरिकांवर दहशत निर्माण करीत ‘तुम्ही कोणीही पुन्हा गावात फिरला अथवा शंकर खेमनर व इंद्रजीत खेमनर यांच्या मागे दिसलात तर तुम्हाला जीवे ठार मारुन टाकू’ अशी धमकी भरली.

बुधवारी (ता.4) सायंकाळी साडेसातनंतर घडलेल्या या घटनेची फिर्याद गुरुवारी पहाटे दाखल करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात होरपळलेल्या तीसवर्षीय महिलेने याबाबत घारगाव पोलिसांना तक्रार दिली असून पोलिसांनी वरील सात निष्पन्न आरोपींसह अज्ञात दहा जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 452, 354, 143, 323, 504, 506 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अ‍ॅट्रोसिटी) कलम 3 (1) (आर), (एस), (2) (व्ही. आय.) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव करीत आहेत. या वृत्ताने तालुक्याच्या पठारभागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *