अकोल्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांना ‘ऑनलाईन’ ठगांचा गंडा! स्टेट बँकेच्या नावाचा वापर; कोड शेअर करताच बँक खाते झाले रिकामे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
डिजिटल क्रांतीने माणसाचे जीवन अधिक सुकर केल्याचे सकारात्मक चित्र एकीकडे दिसत असले तरीही त्याला नकारात्मकतेची दुसरी बाजूही आहे. त्यातूनच आजवर अनेकांची ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याची शेकडो उदाहरणे दररोज समोर येत असतात. मात्र असे असतांना आजही असंख्य सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या लोकांपासून ते सामान्य माणसापर्यंत अनेकजण बनावट ओळख सांगून आलेल्या अशा फोनचे बळी ठरत असून त्यातून त्यांना मोठा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार आता पुन्हा एकदा समोर आला असून यावेळी मात्र डिजिटल ठगांनी चक्क अकोल्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांनाच ऑनलाईन गंडा घातला आहे. डिजिटल व्यवहार करणार्‍यांची अशा प्रकारे फसवणूक होण्याची नेहमीच शक्यता असल्याने शासन, प्रशासनासह बँकांकडूनही वारंवार सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र जेथे आयुक्त दर्जाचे अधिकारीच अशा फसवणुकीचे बळी ठरत असतील तेथे सामान्य माणसांचे काय? असे म्हणायची वेळ या निमित्ताने आली आहे.

याबाबत अकोल्याचे पशुसंवर्धन आयुक्त जालिंदर काशिनाथ थिटमे (रा.गोल्डनसिटी, संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सदरची घटना गेल्या महिन्यात 29 डिसेंबर रोजी ते आपल्या गोल्डनसिटीतील घरी असताना घडल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला व त्याने त्यांच्याशी संवाद साधतांना आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मीरारोड मुंबई येथील मुख्य कार्यालयातून बोलत असल्याचे व आपले नाव राहुलकुमार असल्याचे सांगत गोडगोड बोलून त्यांची विचारपूस केली. काही क्षणांच्या या बोलण्यातून संबंधित ठगाने पशुसंवर्धन आयुक्त थिटमे यांचा विश्वास संपादन करुन आपल्या ठगीचे जाळे विणायला सुरुवात केली.

त्यातून समोरुन बोलणारी व्यक्ती बँक अधिकारीच असल्याचे समजून थिटमे यांनी अगदी मनमोकळेपणाने त्याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केली. या संवादातून ‘बकरा’ फसल्याचे लक्षात येताच राहुलकुमार नावाच्या ‘त्या’ ठगाने त्यांना एनीडेस्क. अ‍ॅप या नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तत्पूर्वी ‘त्या’ ठगाने थिटमे यांचा पूर्ण विश्वास संपादन केल्याने त्यांनीही विनाविलंब लागलीच आपल्या मोबाईलमध्ये सदरचे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉलही केले. त्यानंतर संबंधित ठगाने मोबाईलवर आलेला कोड सांगण्याची विनंती केली. त्यानुसार थिटमे यांनी मोबाईलवर प्राप्त झालेला कोड त्या ठगाला सांगताच अवघ्या काही क्षणात त्यांच्या बँक खात्यातील 80 हजार रुपयांची रक्कम ‘ऑनलाईन’ गायब झाली आणि राहुलकुमार नामक तो ठगही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जालिंदर थिटमे यांनी सुरुवातीला बँकेच्या माध्यमातून गेलेली रक्कम परत मिळते का म्हणून चाचपणी केली. मात्र मोबाईलवर आलेला क्रमांक शेअर केला गेल्याने सदरील व्यवहार हा परस्पर सहमतीने घडल्याप्रमाणे पूर्ण झाल्याचे सांगत बँकेने फौजदारी कारवाईचा मार्ग दाखवला. त्यानुसार मंगळवारी (ता.3) त्यांनी शहर पोलीस ठाण्यात वरीलप्रमाणे आशयाची फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी ‘त्या’ अज्ञात ठगाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या घटनेने शासन, प्रशासनासह बँकांकडून वारंवार अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत सूचित केले जावूनही सुशिक्षित नागरिकच त्याला बळी पडत असल्याचेही स्पष्टपणे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *