शिर्डी महोत्सव काळात साईभक्तांकडून 17.81 कोटींचे दान विविध माध्यमांतून केले दान तर 8 लाख साईभक्तांनी घेतले दर्शन


नायक वृत्तसेवा, शिर्डी
येथील साईबाबा संस्थानच्यावतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या काळात (25 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023) 8 लाख साईभक्तांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. तर या कालावधीत 17.81 कोटींची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कालावधीत दानपेटीतून 8 कोटी 78 लाख 79 हजार 48 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3 कोटी 67 लाख 67 हजार 698 रुपये, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 2 कोटी 15 लाख 18 हजार 493 रुपये, ऑनलाईन देणगीद्वारे 1 कोटी 21 लाख 2 हजार 531 रुपये, चेक/डीडीद्वारे 98 लाख 79 हजार 973 रुपये व मनी ऑर्डरद्वारे 3 लाख 21 हजार 653 रुपये अशी एकूण 16 कोटी 84 लाख 69 हजार 396 रुपये देणगी रोख स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच 1 किलो 849 ग्रॅम सोने (रुपये 90 लाख 31 हजार 167 रूपये) व 12 किलो 696 ग्रॅम चांदी (रुपये 6 लाख 11 हजार 478 रूपये) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्यमातून एकूण 17 कोटी 81 लाख 12 हजार 041 रुपये देणगी संस्थानला प्राप्त झालेली आहे.

शिर्डी महोत्सवाच्या कालावधीत सुमारे 8 लाख साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. ऑनलाईन व सशुल्क दर्शन आरती पासेसद्वारे 1 लाख 91 हजार 135 साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला असून याद्वारे 4 कोटी 5 लाख 12 हजार 542 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच या कालावधीत साईप्रसादालयात 5 लाख 70 हजार 280 साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 1 लाख 11 हजार 255 साईभक्तांनी अन्नपाकिटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच 8 लाख 54 हजार 220 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली. याद्वारे 1 कोटी 32 लाख 19 हजार 200 रुपये प्राप्त झाले आहे.

साईआश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास, साईधर्मशाळा, साईबाबा भक्तनिवासस्थान व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांद्वारे 1 लाख 28 हजार 52 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. तर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 16 हजार 207 साईभक्तांची अशी एकूण 1 लाख 44 हजार 259 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे 31 डिसेंबर 2022 व 1 जानेवारी 2023 या याकालावधीत 171 साईभक्तांनी रक्तदान केले. साईबाबा संस्थानच्यावतीने प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्थानच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरीता, साईभक्तांच्या सुविधांकरीता उभारण्यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरीता करण्यात येत असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *