आवर्तन सुरु असतानाही प्रवरा पात्रातून राजरोस वाळू चोरी! यंत्रणेचा धाकच संपला; पात्रात बैलगाड्या तर घाटांवर रिक्षावाल्यांची टोळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोर, दरोडेखोर, गुन्हेगार, अंमली पदार्थांच्या तस्करांसह वाळू चोरांवर असलेला प्रशासकीय यंत्रणांचा धाक आता पूर्णतः संपुष्टात आल्याचे भयानक दृष्य सध्या संगमनेरात पाहायला मिळत आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी आपले राजकीय उट्टे काढण्याच्या नादात ठराविक तालुक्यातील वाळू उपशावर कठोर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर व अकोले तालुक्यातील अनेक बांधकामे बंद ठेवण्याची वेळ आलेली असताना दुसरीकडे यंत्रणांच्या आयचा घोऽ म्हणत बैलगाड्या, गाढवं आणि रिक्षांचा वापर करुन वाळू तस्करांची नवी जमात सध्या जोमात आली असून त्यांच्याकडून अनिर्बंध वाळू उपशासह बांधकामं अडलेल्यांकडून मनमानी पद्धतीने पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे सत्तांतरानंतर सुशासनाची अपेक्षा ठेवणार्‍या सामान्य नागरिकांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसत असून दिवसाढवळ्या नदीपात्रातून वाळू चोरी आणि भरधाव वेगात बेकायदा रिक्षांमधून होणारी त्याची वाहतूक पाहून संगमनेरात यंत्रणांचा धाकच संपल्याचे चित्र दिसू लागले आहे.

यापूर्वीच्या महसूल मंत्र्यांच्या कारकीर्दीत संगमनेर तालुक्यातील नद्यांची पात्र म्हणजे तस्करांसाठी नंदनवनासमान ठरली होती. एकट्या संगमनेर शहरालगतच्या पात्राचा विचार करता गेल्या दोन दशकांमध्ये एकट्या प्रवरानदीचे पात्र जवळपास 30 ते 35 फूटांपर्यंत खाली गेले असून नदीपात्रात जागोजागी झालेल्या प्रचंड मोठ्या खड्ड्यांनी या कालावधीत अनेक निष्पापांच्या जीवाचा बळीही घेतला आहे. मात्र त्या उपरांतही संगमनेर तालुक्यातील वाळू चोरीवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नसून आजही रात्रीच्या अंधारात मोठ्या वाहनांद्वारा तर दिवसाढवळ्या भंगारातून हजार-दोन हजार रुपयांत विकत आणलेल्या बेकायदा रिक्षा, गाढवं आणि चक्क आवर्तन सुरु असतानाही पाण्यात बैलगाड्या घालून अहोरात्र नद्यांचे पात्र ओरबाडले जात आहेत.

ऐतिहासिक संगमनेर शहराला लाभलेल्या अमृतवाहिनीच्या पात्रात हिवाळा व पावसाळा वगळता संगमनेरकर अबालवृद्ध मोठ्या आनंदाने पोहोण्याचा, नव्या पिढीला पोहण्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबवित. उन्हाळ्याच्या कालावधीत तर प्रवरानदी काठाला अक्षरशः जत्रेचे स्वरुप येत. मात्र कार्यकर्ते पोसण्याच्या नादात ज्यावेळी त्यांना गौण खनिजांची भरमार असलेली नद्यांची पात्रच आंदन म्हणून दिली गेली, त्यातून गेल्या दोन दशकांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर नावाची नवी जमात जन्माला येवून ती आज सर्वत्र फोफावली आहे. त्यांच्या माध्यमातून या दोन दशकांच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला की नदीपात्रातील प्राचीन घाटांसह चक्क पालिकेसह काही गावांच्या पाणी पुरवठा विहिरी व पात्रातील पाईपलाईनही उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे कधीकाळी पोहण्याचा आनंद देणारी नद्यांची पात्रं आज जीव घेणारी ठरत आहेत.

मात्र त्या बदल्यात पालिका अथवा प्रशासनाकडून वाळू तस्करांवर कोणतीही कारवाई करण्याऐवजी चक्क सामान्य नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा वापरुन वाळू तस्करांनी पोखरलेल्या घाटांचे संवर्धन केले जात आहे. या सर्व घडामोडीत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महसूलमंत्रीपद मिळालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले पारंपरिक राजकीय वैरी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातील राजकीय उट्टे काढण्याचे धोरण स्वीकारले. त्यातून पदभार हाती घेताच त्यांनी वाळू चोरीबाबत कठोर भूमिका घेवून कोणत्याही स्थितीत नद्यांच्या पात्रातून थेट वाळू चोरी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश महसूल व पोलीस यंत्रणेला दिले. मात्र या आदेशानंतर काही कालावधीत त्याची कठोर अंमलबजावणी केवळ अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यातच सुरु असल्याचेही स्पष्ट झाल्याने हा निर्णय केवळ राजकीय आकसापोटी असल्याचेही सिद्ध झाले.

गेल्या पाच महिन्यांपासून संगमनेर तालुक्यातील वाळू उपशावर निर्बंध घालण्यात आले. अर्थात पर्यावरणाच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार असला तरी त्यामागे पर्यावरणविषयक जाणीवांचा मात्र अभाव असल्याचे आता दिसू लागले आहे. राजकीय उट्टे काढण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाने संगमनेरातील असंख्य इमारतींची कामे थांबली आहेत. त्यातून मजुरांवर उपासमारीचीही वेळ आली आहे. मात्र ज्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत, अशांना काम थांबवून बसून राहणे परवडणारे नसल्याने त्यांच्याकडून वाट्टेल ती रक्कम उकळून त्यांना वाळू पुरवठा करणार्‍यांच्या टोळ्या आता संगमनेरात जन्माला आल्या आहेत.

दिवस-रात्र गंगामाई घाटापासून पुणे नाक्यावरील पुलापर्यंतच्या पात्रात रिक्षा व बैलगाड्यांमधून वाळू चोरी करणार्‍यांच्या टोळ्या मोकाटपणे हिंडताना दिसतात. त्यांच्याकडून दिवसाढवळ्या नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो व चक्क वाळूच्या गोण्या भरुन त्यांची थप्पी घाटांवर उभारली जाते. या प्रक्रियेत प्रत्यक्ष काम करणारे पाच-दहा चेहरे पाहून एखाद्या पर्यावरण प्रेमीने त्यांना विरोध केल्यास क्षणात आसपासचे पाच-पन्नास वाळू चोर भुंग्यासारखे एकत्र येत असल्याचे बिहारी चित्रही आता प्रवराकाठावर नियमितपणे दिसते. सध्या प्रवरा नदीचे आवर्तन सुरु आहे. एव्हाना नदीत पाणी असल्यास वाळू उपसा केला जात नव्हता. मात्र आता हा इतिहास झाला असून पाणी असो अथवा नसो, संगमनेर तालुक्यातील नद्यांमधून बारामाही वाळू उपसा सुरुच आहे.

त्यासाठी प्रवरा नदीपात्रातील तस्कर टायर-ट्यूबचा अथवा बैलगाडीचा वापर करतात. वाहत्या नदीपात्रात बैलगाडी घालून वाळू असलेल्या ठिकाणी ती उभी केली जाते व त्यानंतर दोन-चार तस्कर पाण्यात उतरुन गोण्या भरुन त्या बैलगाडीत ठेवतात व नंतर ती सगळी वाळू घाटावर आणून रिक्षाद्वारे त्याची वाहतूक केली जाते. दुसरीकडे म्हाळुंगी नदीचे पात्र गाढवांद्वारे वाळू वाहतूक करणार्‍यांना आंदन देण्यात आले असून येथेही गाढव मालकांच्या मोठ्या टोळ्या निर्माण झाल्या असून त्यांच्याकडून सूर्योदय होताच म्हाळुंगीचे लचके तोडायला सुरुवात होते. सकाळच्या सत्रात मनमुराद उपसा झाल्यानंतर हे सगळे वाळू तस्कर दुपारी दारु रिचवून टांगा वर करतात तर त्यांच्या चोरीत सिंहाचा वाटा असलेली मुकी गाढवं मात्र उपाशीतापाशी आसपासच्या कचराकुंड्या, पालिकेने वृक्षारोपणातंर्गत लावलेली झाडे खावून आपली भूक भागवतात. एका राजकीय निर्णयाने गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेला हा प्रकार दिवसोंदिवस वाढतच असून त्यातून वाळू चोरांच्या संघटित टोळ्या निर्माण होवू लागल्या आहेत.


गेल्या काही दिवसांत रिक्षांमधून वाळू तस्करीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र महसूल व पोलीस यंत्रणेकडून त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच काही दक्ष नागरिकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी नाईलाजास्तव केलेल्या कारवाईतून जप्त झालेल्या वाळू तस्करांच्या रिक्षा चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातूनच पळवून नेण्याचेही काही प्रकार घडले आहेत. त्यावरुन संगमनेरात फोफावलेल्या वाळू चोरांवर यंत्रणेचा कोणताही धाक शिल्लक राहिला नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *