‘अगस्ति’ कार्यक्षमतेने चालविण्यासाठी विविध समित्यांची स्थापना! अखिल भारतीय किसान सभेकडून स्वागत; कारखाना स्वयंपूर्ण करण्यास पुढाकार


नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति कारखाना कार्यक्षमतेने चालवून सक्षम करण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाने विविध समित्यांचे गठण केले आहे. अगस्तिचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या या कृतीचे अखिल भारतीय किसान सभेने स्वागत केले असून या समित्या अगस्ति स्वयंपूर्ण करण्यासाठी भरीव योगदान देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

अगस्ति स्वयंपूर्ण होण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांनी अभूतपूर्व समन्वयाने, काटकसरीने व ध्येयवादी वृत्तीने काम करण्याची आवश्यकता आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना सर्वांच्या कार्यक्षमतांचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी जबाबदार्‍यांचे वाटप करण्याची आवश्यकता आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी अगस्ति कारखान्याचे पदाधिकारी व शेतकरी समृद्धी मंडळातील नऊ पक्ष संघटनांचे प्रतिनिधी यांची समन्वय बैठक संपन्न झाली. सदरच्या बैठकीत याबाबतचा आग्रह किसान सभेने व्यक्त केला होता. अगस्ति स्वयंपूर्ण व्हावा यासाठी सादर केलेल्या सात कलमी निवेदनातही किसान सभेने याबाबतचे महत्व अधोरेखीत केले होते. 23 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत समित्या स्थापन करून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये, कार्यकारी समिती सोबतच कामगार व कायदा कक्ष समिती, शेती समिती, बांधकाम व पाणी पुरवठा समिती, ऊस विकास समिती, खरेदी समिती, तांत्रिक समिती व साखर तथा उपपदार्थ विक्री समिती अशा आठ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. सहकारी साखर कारखानदारीमध्ये औपचारिकता म्हणून दरवेळी अशा समित्या स्थापन होतात. मात्र पाठपुरावा व गांभीर्याच्या अभावी त्या केवळ कागदावरच राहतात. अगस्ति कारखान्याची परिस्थिती व सभासदांनी टाकलेला अभूतपूर्व विश्वास पाहता यावेळी समित्यांच्या स्थापना व कारभार अधिक गांभीर्याने व ध्येयवादी पद्धतीने होण्याची आवश्यकता आहे.

अगस्ति कारखाना स्वयंपूर्ण व्हावा यासाठी उस उपलब्धता, ऊस बेणे, उसाची खरेदी किंमत, मनुष्यबळ, वेतन व मजुरीवरील खर्च, कन्व्हर्जन कॉस्ट, फॅक्टरी ओव्हरहेड, उपपदार्थ निर्मिती या 7 मुद्यांच्या आधारे किसान सभेने आग्रह प्रस्ताव सादर केला आहे. व्हीएसआयने अगस्ति कारखान्याबाबत चिन्हांकित केलेल्या मुद्यांच्या आधारे सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावातील मुद्दे संचालक मंडळ व नवनियुक्त समित्या गांभीर्याने घेतील असा विश्वास किसान सभेने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *