संगमनेरातील ‘त्या’ कार्यक्रमातून ‘लव्ह जिहादला’ प्रोत्साहन! सकल हिंदू समाजाचे निवेदन; आयोजकांनी कार्यक्रम रद्द करीत घेतली माघार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या देशातील सामाजिक वातावरण खराब करण्यासाठी काही अपप्रवृत्ती सक्रिय झाल्या आहेत. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या सणांचे अथवा प्रसंगांचेे औचित्य साधून समाजातील महिला व मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे पद्धतशीर षडयंत्र राबविले जात आहे. अशाच प्रकारच्या षडयंत्राचा भाग असल्याचा संशय असलेला एक कार्यक्रम संगमनेरातही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेव्ह पार्टीसारख्या प्रकारांना उत्तेजन देण्यासह लव्ह जिहाद रुजवण्याचा प्रयत्न असल्यानेच या कार्यक्रमात महिलांना मोफत तर पुरुषांना दोनशे रुपये प्रवेशिका ठेवण्यात आली आहे. सदरील कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी सहभागी व्हाव्यात यासाठी आयोजकांनी महाविद्यालयात जावून त्याचा प्रचार-प्रचार केला आहे. हा कार्यक्रम झाल्यास त्यातून एखादी अप्रिय घटना समोर येवून शहराच्या शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने या कार्यक्रमाला कोणत्याही स्थितीत परवानगी देवू नये अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाजाच्यावतीने संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आले आहे.

संगमनेर शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात यापूर्वी कधीही अस्तित्त्वात नसलेल्या ‘लिजंड एंटरटेनमेंट’ या नव्याने समोर आलेल्या समुहाने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शनिवारी (ता.31) सायंकाळी ‘डी. जे. नाईट’ अशा मथळ्याखालील संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या महिला व मुलींना मोफत प्रवेश देण्यात येणार असून पुरुषांना येथील कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास दोनशे रुपये मोजावे लागणार आहेत. त्यातही महिलांसाठी विनामूल्य असलेल्या प्रवेशिका मिळवण्यासाठी दोन मोबाईल क्रमांकही देण्यात आले असून त्यावर फोन करुन प्रवेशिका प्राप्त करण्यास सांगण्यात आले आहे. हाच मुद्दा हिंदुत्त्ववादी संघटनांना खटकला असून या माध्यमातून महिला व मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवण्याचे पद्धतशीर षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोपही पोलिसांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करताना भारतीय संस्कृतीचे अपपालन करणे गैर आहे. गेल्या काही कालावधीत यंत्रणांनी केलेल्या कारवायांमधूनही अशा प्रकारच्या गोंडस नावाने आयोजित झालेले कार्यक्रम रेव्हपार्टी म्हणून उघड झाले आहेत. अशा कार्यक्रमांच्या आयोजनामागे अंमली पदार्थांच्या तस्करांचाही हातभार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे संगमनेरात होवू घातलेल्या या कार्यक्रमातूनही असाच प्रकार राबविला जाणार असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजकांची सखोल चौकशी होण्याची गरजही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

देशात लव्ह जिहादमुळे महिला व मुलींच्या हत्या झाल्याचे एकामागून एक प्रकार समोर येत आहेत. अनेक मुलींना प्रेमजाळात फसवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले गेल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचीही शेकडो उदाहरणे आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री संगमनेरात होवू पाहणारा हा कार्यक्रमही अशाच षडयंत्राचा भाग आहे. गोंडस नावाखाली आयोजित झालेल्या हा कार्यक्रम नशापाणी, ओंगळ प्रकारचे नृत्य, ध्वनि मर्यादा, छेडछाड, महिलांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना त्रास देण्याचा प्रकार अशा गोष्टींना प्रोत्साहन देणारे ठरेल. महिला व मुलींना मोफत प्रवेशाचे अमिष दाखवून नोंदणीच्या नावाखाली त्यांची माहिती संकलित करुन त्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यताही या निवेदनातून वर्तवण्यात आली आहे.

सदरील कार्यक्रम भारतीय संस्कृतीचे विडंबन करणारा आणि रेव्हपार्टी, लव्ह जिहादसारख्या तरुणींचे आयुष्य उध्वस्त करणार्‍या प्रकारांना खतपाणी घालणारा आहे. हा कार्यक्रम आयोजित करणार्‍या संस्थेचा कोणताही पूर्वइतिहास नसून औचित्य शोधून आपले षडयंत्र रेटण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे सदरील कार्यक्रम झाल्यास त्यातून शहराच्या सामाजिक स्वास्थाला धोका निर्माण निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीत सदरच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येवू नये अशा आशयाचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना देण्यात आले असून त्यावर कुलदीप ठाकुर, सचिन कानकाटे, अ‍ॅड. विशाल जाधव, सुदर्शन इटप, विशाल वाकचौरे, योगेश सूर्यवंशी, लखन जेधे, सौरभ देशमुख, मनोज डोंगरे, शुभम कपिले, विकास शिंदे, विश्वास मिसाळ, गोविंद नागरे आदिंच्या सह्या आहेत.


महिलांना मोफत प्रवेश आणि पुरुषांना मात्र दोनशे रुपये प्रवेशिका ठेवून मूळ हेतूतच संशय निर्माण करणार्‍या या कार्यक्रमाला हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. मात्र त्या उपरांतही आयोजकांनी विविध महाविद्यालयांमध्ये जावून विद्यार्थीनींना मोफत प्रवेशिका वाटप करुन त्यांना कार्यक्रमाकडे आकर्षित करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे अखेर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शहर पोलिसांना निवेदन देत आपला विरोध दर्शविला. त्यातून कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होवू नये यासाठी पोलिसांनी आयोजकांना नोटीसाही बजावल्या. पोलिसांच्या या कारवाईनंतर मात्र हादरलेल्या आयोजकांना शनिवार 31 डिसेंबरच्या संध्येला होणारा सदरचा कार्यक्रम रद्द करीत असल्याचे लेखी पत्र पोलिसांना सोपविले आहे.


31 डिसेंबर रोजी संगमनेर शहरात होणार्‍या ‘डी. जे. नाईट’ या कार्यक्रमाबाबत आक्षेप घेणारे निवेदन शहरातील काही संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी आम्हाला दिले होते. त्यावरुन शहरातील शांतता व सुवव्यस्थेची स्थिती बिघडू नये त्या अनुषंगाने आम्ही सदरील कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीसाही बजावल्या होत्या. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजकांनी सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पत्र आम्हाला दिले असून शनिवारी असा कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे कळविले आहे.
– राजेंद्र भोसले
पोलीस निरीक्षक, संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *