डोळासणे महामार्ग पोलिसांची 17 हजार वाहनांवर कारवाई! 2 कोटी 59 लाख 61 हजारापैकी 1 कोटी 23 लाख 50 हजारांचा दंड वसूल
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी 2022 या सरत्या वाहतुकीचे नियम मोडणार्या एकूण 17 हजार 139 छोट्या-मोठ्या वाहनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या इंटरसेप्टर या वाहनाच्या माध्यमातून कारवाई करत 2 कोटी 59 लाख 61 हजार 400 रुपयांचा दंड केला आहे. त्यापैकी 1 कोटी 23 लाख 50 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

वाहतूक नियम मोडणार्यांवर प्रभावीरित्या नियंत्रण मिळविता यावे यासाठी डोळासणे महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले इंटरसेप्टर वाहन दाखल झाले आहे. त्यामुळे या वाहनाच्या माध्यमातून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्या छोट्या-मोठ्या वाहनांवर करडी नजर राहत आहे. वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून ऑनलाइन दंडही होत आहे. 2022 या सरत्या वर्षात 17 हजार 139 छोट्या-मोठ्या वाहनांवर कारवाई करुन तब्बल 2 कोटी 59 लाख 61 हजार 400 रुपयांचा दंड केला असून त्यापैकी 1 कोटी 23 लाख 50 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनचालक सर्रासपणे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करुन सुसाट वेगाने वाहने चालवितात. परंतु, सुरक्षित प्रवास व्हावा आणि अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करता यावी म्हणून डोळासणे महामार्ग मदत पोलीस केंद्र कार्यरत आहे. मात्र, कारवाई करुनही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.
31 जणांचा अपघातात बळी!
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेखिंड ते कर्हे घाट, कोल्हार घोटी रोड-कोकणगाव ते भंडारदरा आणि संगमनेर ते तळेगाव दिघे या सर्व ठिकाणी 2022 या सरत्या वर्षात 27 अपघातांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त अपघात हे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. त्याचबरोबर 18 गंभीर अपघातांमध्ये 22 जण जखमी झाले आहेत.