अशोक चौकातील दोघा फेरी विक्रेत्यांमध्ये तुंबळ हाणामार्‍या! दुपारच्या भांडणाचा रात्रीही वचपा काढला; चॉपरच्या हल्ल्यात एकजण गंभीर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दरोडे, घरफोड्या, चोर्‍या, सोनसाखळ्या व मोटार सायकल लांबवण्याच्या एकामागून एक घटना समोर येत असताना आता किरकोळ कारणावरुन दोघा फेरी विक्रेत्यांमध्ये फ्री-स्टाईल रंगल्याचे व त्याचे पर्यवसान थेट एकाच्या मुलावर चॉपरने हल्ला करण्यात झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुपारी शहरातील प्रचंड वर्दळीच्या अशोक चौकात घडलेल्या या पडसाद रात्री पुन्हा उमटले आणि त्यात मारहाण करणार्‍यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्याकडे निघालेल्या तरुणाला रस्त्यातच अडवून दहा ते बारा जणांनी त्याला पुन्हा बेदम मारहाण करीत त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एकूण बाराजणांवर जीवघेण्या हत्यारासह हल्ला करण्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोमीनपूरा परिसरात काहीकाळ तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.28) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणार्‍या अशोक चौकातील भंडारी मंगल कार्यालयाजवळ घडली. या घटनेत एकमेकांच्या समोर रस्त्यावरच बसून कपबशा व महिलांच्या वापराच्या पिशव्या (बॅग) विकणार्‍या दोघांमध्ये सुरुवातीला हमरीतुमरी झाली. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांवर फ्री-स्टाईल पद्धतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्यानंतर आसपासच्या दोन्ही बाजूच्या काहींनी मध्यस्थी करीत त्या दोघातील वादावर पडदा टाकला. त्यामुळे सदरचे प्रकरण संपले असे वाटत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ बंद होण्याच्या वेळेला पुन्हा वादाची ठिणगी पडली.

दुपारी घडलेल्या प्रकरणातील फेरी विक्रेता मेहबुब इब्राहिम पारवे (रा. मोमीनपुरा) यांचा मुलगा उमेर पारवे हा रात्री नऊच्या सुमारास महेश पतसंस्थेसमोरील बोळाच्या कोपर्‍यावर आपल्या काही मित्रांसमवेत बोलत असताना दुपारच्या भांडणाचा राग मनात धरुन दुसर्‍या फेरी विक्रेत्याचा मुलगा आपल्या साथीदारांसह तेथे आला व त्याने उमेर पारवे याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची फिर्याद देण्यासाठी सदरील तरुण मोमीनपुर्‍यातून पोलीस ठाण्याकडे जात असताना या मंडळीनी त्याला पुन्हा बाप्ते किराणा दुकानाजवळ अडवून पुन्हा मारहाण करीत त्याच्यावर चॉपरने हल्ला केला. त्यात तो रक्तबंबाळ होवून जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जखमी तरुणाचे वडील मेहबुब पारवे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी निखील मुर्तडक, श्याम अरगडे, नयम मुर्तडक, सुनील धात्रक, सागर (पूर्ण नाव माहिती नाही.) व त्यांच्या सोबतच्या अन्य पाच ते सहा जणांविरोधात जीवघेण्या हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 326, 324, 323, 504, 506 सह बेकायदा जमाव जमवून दंगल केल्याच्या कलम 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दुपारी चार वाजता सुरु झालेल्या या वादाने अशोक चौक ते मोमीनपुरा या परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही सामंजस नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या व्यक्तिगत वादाला जातीयतेचा रंग देण्याचा काहींचा प्रयत्न फसल्याने निर्माण झालेला तणाव निवळला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांच्याकडे देण्यात आला आहे.


गेल्या़ वर्षभरापासून संगमनेर नगरपालिकेत प्रशासन राज असल्याने शहरातील अतिक्रमणांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. बसस्थानकाकडून जुन्या शहरात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते चावडी चौकापर्यंत जागोजागी अतिक्रमणधारक व फेरीविक्रेत्यांनी भरररस्त्यातच जागा अडवल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच दुपारनंतर या रस्त्यावर महिला व मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यातून एखादी गंभीर घटना घडण्याची नेहमीच शक्यता असते. पालिकेने वर्दळीच्या या रस्त्यावरील अतिक्रमणे मर्यादेच्या पलिकडे जाणार नाहीत यासाठी वारंवार मोहिमा राबविण्याची गरजही यातून स्पष्टपणे समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *