घरफोड्यांच्या संगतीला आता सोनसाखळीच्याही चोर्या! चोरांची दहशत; संगमनेरात पोलिसांचे अस्तित्व असूनही नसल्यासारखेच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पंधरवड्यापासून सुरु झालेल्या दरोडे, घरफोड्या व चोरीच्या घटनांमध्ये बुधवारी प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावरुनच सोनसाखळ्या लांबविण्याच्या प्रकाराची भर पडली. त्यामुळे संगमनेरची शांतता आणि सुव्यवस्था अगदी लयाला गेल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांचे अस्तित्त्व असूनही नसल्यासारखे झाले आहे. त्यातच अमृतवाहिनी महाविद्यालयातील अकोल्याच्या विद्यार्थ्याचा खून होवून तब्बल वीस दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांच्या हाती धुपाटणेच असल्याने जिल्ह्यात प्रगत शहराची शेखी मिरवणार्या संगमनेरची सामाजिक स्थिती कधी नव्हे इतकी खालावली आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोनसाखळी लांबविण्याचा हा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता.28) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रचंड वाहतूक आणि माणसांनी सतत गजबजलेल्या चक्क नवीन नगर रस्त्यावर घडली. एक अनोळखी महिला या रस्त्यावरील अभिनव नगर वसाहतीच्या वळणाजवळून जात असताना दोघा दुचाकीस्वाराने त्या महिलेच्या काही अंतर पुढे जात आपली ‘पल्सर’ दुचाकी उभी केली. यावेळी पाठीमागे बसलेला व स्वतःचे तोंड रुमालाने झाकलेला एक चोरटा पायी पाठीमागे गेला व त्याने सदर महिलेकडे काहीतरी चौकशी करण्याचा बहाणा करीत तिच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडली. हा संपूर्ण प्रकार त्या परिसरात असलेल्या एका डॉक्टरांच्या बाह्यरुग्ण रुग्ण विभागाच्या बाहेरील बाजूस लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यासमोरच घडला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेल्या त्या एकट्या महिलेच्या ही गोष्ट लक्षात येईस्तोवर त्या चोरट्याने काही क्षणात दुचाकी सुरुच ठेवून काही अंतर पढे थांबलेल्या आपल्या जोडीदाराच्या दिशेने धाव घेतली आणि काही वेळातच ते दोघेही वर्दळीच्या नवीन नगर रस्त्यावरुन अदृष्य झाले. त्यानंतर या महिलेने हा प्रकार तेथील डॉक्टरांसह काहीजणांच्या लक्षात आणून दिल्यानंतर काही उत्साही तरुणांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जे कधी पोलिसांच्या हाती लागत नाहीत ते त्यांच्या हाती कसे लागणार?
बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत संबंधीत महिलेने वृत्तलिहेपर्यंत शहर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदविलेली नव्हती, त्यामुळे सदर महिलेच्या गळ्यातील दागिने बेनटेक्सचे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. या घटनेची तक्रारच नसल्याने पोलिसांनीही कानावर हात ठेवले असून त्यांच्या दृष्टीने घटना घडूनही गुन्हा दाखल झाला नसल्याने शहरात सर्व काही आलबेलच आहे. मात्र ही घटना सामान्य संगमनेरकराच्या मनात दहशत निर्माण करणारी ठरली असून पंधरवड्यापासून झोपेत घरं फुटण्याची भीती मनात असताना आता त्यात बाहेर वावरणंही सोपं नसल्याच्या धास्तीची भर पडली आहे.