सम्मेद शिखरासारख्या धार्मिक स्थानांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा नको! संगमनेरातील सकल जैन समाजाचे निवेदन; पालीताना तीर्थस्थळाबाबतही लक्ष्य वेधले


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जैन धर्मातील वीस तीर्थकरांनी मोक्षाचा मार्ग प्राप्त केलेल्या झारखंडमधील सम्मेद शिखराचा परिसर केंद्राने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत केला. सरकारच्या या निर्णयाला देशभरातून मोठा विरोध होत असून संगमनेर तालुक्यातील जैन बांधवही आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी बंद आणि निवेदने सादर करण्याचे आंदोलन करण्यात आले होते. संगमनेरातील जैन समाजानेही तहसीलदारांना निवेदन देवून आपल्या भावना प्रकट केल्या असून धार्मिकस्थळांना पर्यटनाच्या श्रेणीत टाकून त्यांचे पावित्र्य नष्ट करु नये अशी विनंती त्या द्वारे करण्यात आली आहे.

झारखंडमधील गिरीडोह जिल्ह्यातील छोटा नागपूर पठारावर जैन धर्मियांमध्ये आस्था आणि भावनेचे प्रतीक असलेल्या श्री सम्मेद शिखर परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी झारखंड सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला होता. त्यावरुन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने 2 ऑगस्ट 2019 रोजी याबाबतची अधिसूचना पसिद्ध करुन या पवित्र धार्मिक स्थळाला पर्यटनक्षेत्राचा दर्जा जाहीर केला होता. तेव्हापासून अखिल विश्वातील जैन अनुयायांनी त्याला प्रखर विरोध देशभर आंदालने व निदर्शने केली. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करण्यासोबतच झारखंड सरकारचा निर्णय रद्द करण्यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली होती.

त्याचा भाग म्हणून बुधवारी (ता.21) जैन समाजाच्यावतीने ठिकठिकाणी मोर्चे काढून झारखंड सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला. संगमनेर तालुक्यातही जैन समाजाची मोठी संख्या असून बुधवारी संगमनेर शहर व आश्वीत या विषयावर सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ व जैन दिगंबर मूर्तीपूजक संघासह समाजातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून सम्मेद शिखर या स्थळाचे धार्मिक महत्व अधोरेखीत करण्यात आले होते. सरकारचा निर्णय मागे अयोग्य व जैन समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले होते. याच निवेदनात गुजरातमधील पालीताना येथील डोंगरावरील आदिनाथ भगवानांच्या पादुकांची झालेली तोडफोड व समाजकंटकांच्या वाढत्या उपद्रवाबाबतही सांगण्यात आले आहे.

एकाच दिवशी देशभरात झालेल्या या आंदोलनाची दखल घेत झारखंडचे पर्यटन विकासमंत्री हफीजुल हसन अन्सारी यांनी बुधवारी (ता.21) उशिराने सम्मेज शिखरजी तथा पार्श्वनाथ पर्वताला दिलेला पर्यटनस्थळाचा दर्जा मागे घेत असल्याचे सांगत या स्थळाला पूर्वीप्रमाणेच तीर्थस्थळाचा दर्जा बहाल केल्याची घोषणा केली. त्यामुळे जैन समाजाच्या आंदोलनाला यश आले असून या स्थळाचे धार्मिक महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी सुरु असलेले समाजाचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. बुधवारी समाजाच्यावतीने देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी स्वीकारले. यावेळी त्यांनी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले. याप्रसंगी शिरीष दर्डा, संतोष मेहता, रवींद्र गंगवाल, प्रदीप शहा, वसंत फिरोदिया, राजकुमार पारख, प्रफुल्ल बोगावत, विलास दर्डा, प्रशांत शहा, राजेश ओहरा, संपत धाडिवाल, डॉ. वखारिया व अमोल मेहता यांच्यासह सकल जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *