मिशनरींकडून धर्मांतर होत असल्याच्या संशयावरुन संगमनेरात खळबळ! चैतन्यनगरमधील घटना; नागरिकांना धर्मप्रसारक पुस्तिका वाटण्यावरुन निर्माण झाला वाद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहुरी येथील शीख समाजाच्या एका लहान विद्यार्थ्याला चक्क शाळेच्या वर्ग शिक्षिकेकडूनच धर्मांतराचा सल्ला देण्याच्या प्रकारावरुन संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली असताना आता त्यात तेल ओतणारा आणखी एक गंभीर प्रकार संगमनेरातून समोर आला आहे. या घटनेत काही मिशनरींकडून धर्मप्रचाराच्या नावाखाली गरीब हिंदु धर्मीयांना हेरुन त्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या संशयावरुन काही हिंदुत्त्ववादी तरुणांनी हल्लाबोल करीत त्यांना जाब विचारल्याने शहरातील चैतन्यनगरमध्ये मोठी खळबळ माजली होती. मात्र यातून वास्तवाचे दर्शन घडण्यापूर्वीच काही राजकारण्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केल्याने खरा प्रकार समोर येण्यापूर्वीच ‘त्या’ मिशनरींना दमदाटी करणार्‍या एका निष्पन्न नावासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार सदरचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता.16) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास चैतन्यनगरच्या गल्ली क्रमांक दहामध्ये घडला. या भागात ख्रिस्त धर्माचा प्रचार-प्रसार करणारे काही मिशनरी आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाले होते व त्यांच्याकडून परिसरात राहणार्‍या काही रहिवाशांना त्यांच्या धर्माची महती सांगणार्‍या छोट्या पुस्तिकांचेही वाटप करण्यात आले होते. या प्रकारानंतर परिसरातील लहान मुले व काही महिलांना एकत्रित करुन येशूख्रिस्तांच्या संदर्भातील प्रार्थना गायनाचा कार्यक्रम सुरु असतानाच या प्रकाराची कुणकुण लागलेले काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी या कार्यकर्त्यांनी तेथे सुरु असलेला कार्यक्रम बंद पाडीत तेथे हजर असलेल्या मिशनरींकडून धर्म परिवर्तन केले जात असल्याचा आरोप करीत गोंधळ घातला.

या घटनेदरम्यान एका राजकीय पुढार्‍याच्या मुलाने या गोंधळात हस्तक्षेप करीत आपली राजकीय पोळी भाजण्याचा संतापजनक प्रकार केल्याचेही समोर आले. या गोंधळातच धर्म प्रचाराच्या नावाखाली हिंदुबहुल असलेल्या या परिसरात शिरलेल्या ‘त्या’ मिशनर्‍यांसह त्यांच्या अनुयायांना धक्काबुक्की, दमदाटी व शिवीगाळही करण्यात आली. त्यामुळे सुरु असलेल्या गोंधळात अधिक भर पडल्याने या परिसरातील वातावरण काहीकाळ तणावाचे बनले होते. त्यातच ही घटना समजताच हिंदुत्त्ववादी तरुणांची संख्याही वाढू लागल्याने परिस्थिती अधिक स्फोटक बनली होती. काहींच्या मध्यस्थीनंतर हा प्रकार शांत झाला, मात्र त्यानंतर काही वेळाने चैतन्यनगरमध्ये प्रार्थनेचे उघड कार्यक्रम घेणार्‍या या मिशनर्‍यांसह त्यांच्या समर्थकांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा आग्रह सुरु केला.

त्यांच्या या आग्रहात ‘त्या’ राजकारण्याचे वजनही सामील असल्याने अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली. सदर प्रकरणी गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच हिंदुत्त्ववाद्यांचा गटही पोलीस ठाण्यात जमा होवू लागला. त्यामुळे आधी चैतन्यनगर व नंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत एकीकडे फादर प्रशांत भास्कर शहाराव यांना धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने गुन्हा दाखल करण्याचा आग्रह सुरु असताना दुसरीकडे बळजोरीने धर्मांतर करीत असल्याने ‘त्या’ सर्वांवर गुन्हा दखल करावा अशी मागणी समोर येवू लागल्याने पोलिसही चक्रावले होते. अखेर पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी समन्वयातून मार्ग काढीत झाल्या प्रकाराबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवल्याने हे प्रकरण शांत झाले.

याप्रकरणी जय रमेश थोरात (वय 24, रा. विजयनगर) याने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी संदेश आंधळे (रा. इंदिरानगर) याच्यासह अज्ञात तिघांविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तो व त्यांच्या सोबतची इतर मंडळी चैतन्यनगरच्या गल्ली क्रमांक दहामध्ये धर्माची प्रार्थना म्हणत असतांना आरोपी तेथे आले. यावेळी त्यांनी ‘तुम्ही एवढ्या मोठ्याने प्रार्थना का म्हणत आहात?’ असा सवाल करीत ‘आम्हाला मोठ्या आवाजाचा त्रास होतोय’ असे त्यांना सांगत शिवीगाळ सुरु केली. हा प्रकार सुरु असतांनाच धर्मप्रचारकांसोबत असलेले फादर प्रशांत भास्कर शहाराव तेथे आले व त्यांनी आरोपींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र आरोपींनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करीत धक्काबुक्की केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लहान मुलांना व महिलांनाही त्या चौघांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचे तक्रारीतून सांगण्यात आले. सदर प्रकरणी पोलिसांनी वरील चौघांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून जमलेला जमाव पांगवला. मात्र हा प्रकार वायुवेगाने शहराच्या कानाकोपर्‍यात पसरल्याने गावभर त्याची चर्चा सुरु झाली. त्याचवेळी जुन्या पोस्टाजवळील भीषण अपघातात एका विद्यार्थीनीचा बळी गेल्याचे समोर आल्याने संपूर्ण शहराचे लक्ष्य त्या घटनेकडे वेधले गेल्याने पुढील अनर्थ टळला.

गेल्या पंधरवड्यात राहुरी येथील एका शाळेतील शीख समाजाच्या लहान विद्यार्थ्यांला त्या शाळेच्या वर्गशिक्षिकेने नानाविध प्रश्न विचारताना चक्क धर्मांतर करण्याचा अजब सल्ला दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. त्यावरुन जिल्हाभरातील वातावरण गढूळ झालेले असतानाच संगमनेरातील हा प्रकार समोर आल्याने मोठा अनर्थ घडण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. मात्र हिंदुत्त्ववादी गटातील काही नेते व पोलिसांनी समन्वयातून मार्गक्रमण केल्याने या घटनेनंतर काहीकाळ निर्माण झालेला तणाव निवळला. मात्र या घटनेची चर्चा आजही गल्लीबोळात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *