ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना हानी पोहोचण्याची शक्यता महागड्या औषध फवारणीमुळे शेतकरी सापडले आर्थिक संकटात


नायक वृत्तसेवा, अकोले
खरीप हंगाम नुकताच वाया गेला आहे. त्यातून कसेबसे सावरुन शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. मात्र, संकटं काही शेतकर्‍यांची पाठ सोडण्याचे नाव घेईना. आता वातावरणात अचानक बदल झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना हानी पोहोचण्याची भीती शेतकर्‍यांना सतावू लागली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असल्याने अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीन, भात, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते. बरेच दिवस ओलावा असल्याने रब्बीसाठी शेत तयार करता येत नव्हते. यावर कशीबशी मात करीत मोठ्या उमेदीने रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची पेरणी केली. सध्या कांदा पिकाची लागवडही सुरु असून पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्याने रब्बीच्या क्षेत्रात थोडी वाढ झाली. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत आहे.

ढगाळ वातावरण तयार होत असल्याने गहू, हरभरा, घास पिकांवर रोगराई येण्याची भीती अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची औषध फवारणीची लगबग देखील सुरू आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्यासह पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून विविध नैसर्गिक आपत्ती शेतकर्‍यांचा पिच्छा पुरवत असल्याचे दिसत आहे. खरीप हंगामात अगोदरच पिकांना फटका बसलेला असताना, आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके संकटात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *