शिवसेनेचे राहुरी कृषी विद्यापीठात ठिय्या आंदोलन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, राहुरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून दोन महिने उलटले तरी अद्यापही शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. त्यासाठी विमा कंपनी व शासनाच्या विरोधात राहुरी विद्यापीठ येथे शिवसेनचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी सहसंचालक नाईकवाडी व राहुरी तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे गट शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले, गेल्या दोन वर्षांपासून करोनाचे सावट असल्याने शेतकरी पूर्णपणे रसातळाला गेला आहे. त्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे पूर्णपणे कंबरडे मोठे आहे. राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले. दिवाळीला शेतकर्‍यांना मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्यापही कुठल्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. ठराविक तालुक्यामध्ये व ठराविक ठिकाणी पक्षपाती मदत करण्याचे काम या शासनाने केले आहे.

संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतामध्ये सलग चार महिने पावसाचे पाणी होते. त्यामुळे सर्वच शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मदत मात्र ठराविक मतदारसंघातच करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सत्ताधारी असलेल्या तालुक्यांनाच मदत मिळाली आहे. त्यांच्या या पक्षपाती धोरणावर आवाज उठवण्याचे काम शिवसेना करणार आहे. तसेच येत्या आठ दिवसांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर मदतीचे पैसे नाही आले तर कुठलेही पूर्वसूचना न देता शिवसेना आपल्या स्टाईलने रास्ता रोको आंदोलन करण्याचा तसेच कुठल्याही मंत्र्यांना अहमदनगर जिल्ह्यात फिरकू न देण्याचा इशारा जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना तालुका उपप्रमुख सचिन म्हसे, जिल्हा उपप्रमुख भागवत मुंगसे, अनिल चव्हाण, भगीरथ पवार, प्रशांत शिंदे, कैलास शेळके, रमण खुळे, सुभाष चोथे, हरिभाऊ शेळके, पोपट शिरसाठ, सुभाष बाचकर, संदीप म्हसे, ओमकार खेवरे, विक्रम पेरणे, सुरज पोटे, हमीद पटेल, विजय शिरसाठ, सोमा फुलारे, विठ्ठल सूर्यवंशी, बाळू शिंदे, सोमा हारदे, भगवान जाधव, अनिल गागरे, प्रमोद भट्टड, सचिन करपे आदिंसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *