दलालांच्या विळख्यात अडकली संगमनेरची वीज वितरण कंपनी! उपकार्यकारी अभियंत्याचा मनमानी कारभार; आठही अभियंत्यांकडून स्वतंत्र दलालांचीही नियुक्ती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी प्रतिथयश व्यापारी तथा संगमनेर मर्चन्टस बँकेचे माजी अध्यक्ष श्रीगोपाळ पडताणी यांचे वीज कनेक्शन तोडल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या भ्रष्टाचारी कारभाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या विभागात गेल्या अनेक वर्षांपासून पदावर चिकटून बसलेल्या एका वरीष्ठ अधिकार्‍याने ‘ठेकेदार हेच जीवन’ मानून कारभार सुरु केल्याने त्याची परिणीती अख्खा विभागच आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकला आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम न होणार्‍या वीज कंपनीतील एका हंगामी कर्मचार्‍याचेही अनेक किस्से समोर येत असून या कर्मचार्‍याने शहरातील अनेकांकडून हजारों रुपये घेवूनही त्यांची कामे झालेली नाहीत, मात्र असे असतांनाही त्याच्यावर आजवर कोणतीही कारवाई न झाल्याने संगमनेरची वीज वितरण कंपनी म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेवून सध्या संगमनेर उपविभागात कार्यरत असलेल्या सर्व अधिकार्‍यांच्या मालमत्तेची कसून चौकशी करण्याची मागणीही आता होवू लागली आहे.


याबाबत वीज कंपनीच्या गलथान कारभाराची माहिती संकलीत करतांना सर्वसामान्यांकडून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असून वैभवशाली शहराच्या छत्रीत फोफावलेला भ्रष्टाचाराचा हा वृक्ष तोडण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वीज कंपनीतील अनागोंदी वाढण्यात या विभागाच्या वर्ग एकच्या उपकार्यकारी अभियंत्याचा सिंहाचा वाटा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये स्थायीक असलेला हा अधिकारी केवळ ठेकेदाराचे काम असेल तरच संगमनेर कार्यालयात येतो असेही या निमित्ताने समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्या ठेकेदाराचे काम आहे, त्याने चिरीमिरी तर द्यायचीच शिवाय या साहेबांच्या दुपारच्या जेवणाचीही सोय करणं आवश्यक असल्याचेही यातून समजले आहे.


वीज हा नागरीकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे वेळोवेळी शासनाकडून वरीष्ठ अधिकार्‍यांना मुख्यालयात थांबण्याबाबत आदेश दिले जातात. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे संगमनेरच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी आजवर वरीष्ठांच्या अशा आदेशांना कधीही भाव दिलेला नाही. त्यातही कहर म्हणजे या अधिकार्‍याविरोधात असंख्य तक्रारी असूनही त्याच्यावर आजपर्यंत शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. याचाच अर्थ या अधिकार्‍याला प्रशासनीक अथवा राजकीय वरदहस्त प्राप्त असून त्याने काहीही केले आणि कसेही वागले तरीही कारवाईच होत नसल्याने संपूर्ण संगमनेर उपविभागात त्याची दहशत निर्माण झाली आहे.

त्याचा परिणाम या अधिकार्‍याच्या हाताखाली काम करणार्‍या वीज वितरण कंपनीतील अन्य आठ कनिष्ठ अभियंत्यांनीही त्याच्याप्रमाणेच हातात ‘भ्रष्टाचाराचा साबण’ घेवून सर्वसामान्य संगमनेरकरांचे खिसे धुण्यास सुरुवात केली आहे. या सर्व आठही अधिकार्‍यांनी आपापले स्वतंत्र दलाल नियुक्त केले असून त्यांच्या मार्फत काम घेवून गेल्यासच ते पूर्ण होवू शकते अशी स्थिती सध्या संगमनेरात निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शहराची जबाबदारी असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याने वीज कंपनीत हंगामी तत्त्वावर काम करणारा ‘सागर’ नावाचा एक ‘तळीराम’ हाताशी धरला असून 24 तास नशेत तर्रर असूनही या कर्मचार्‍याचे कोणीही वाकडे करु शकत नाही.


या कर्मचार्‍याने संगमनेरातील अनेक व्यापारी व सामान्य नागरीकांकडून आजवर मीटर बदलणे, दुरुस्ती करणे अथवा वीज जोडाच्या अन्य कामासाठी हजारों रुपये उकळले आहेत, मात्र त्यातील अनेकांची कामे आजही झालेली नाहीत. त्यामुळे या हंगामी कर्मचार्‍याच्या असंख्य तक्रारीही शहर विभागाच्या एका ‘मोडले’ल्या कनिष्ठ अभियंत्याकडे केल्या गेल्या. पण तो कर्मचारी त्यांच्यासाठीच मलिदा लाटीत असल्याने आजवर हंगामी असूनही तो कर्मचारी कायम आहे. विशेष म्हणजे ‘सागर’ नाव असलेला हा कर्मचारी सकाळपासूनच दारुच्या नशेत तर्राट झालेला असतो, अनेकवेळा तो व्यभिचारी महिलांसोबत संगमनेरच्या काही लॉजमध्येही नजरेस पडत असतो असेही नागरीक आता सांगू लागले आहेत. त्यावरुन त्याच्याकडे येणार्‍या पैशांचा सहज अंदाज बांधला जावू शकतो.


ग्राहकांना मिळणार्‍या देयकांवर मीटर रिडींगचे छायाचित्र नसल्याबाबत असंख्य तक्रारीही या निमित्ताने कानावर आल्या. त्याची शहनिशा करण्यासाठी सदरचे काम करणार्‍या ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून खराब मीटर, मीटरवरील संख्या न दिसण्याचे प्रकार, घरात बसवलेले मीटर, मीटरच्या वरील आवरणामूळे न दिसणारे रिडींग अशा असंख्य तक्रारींबाबत त्यांनी गेल्या दीड-दोन वर्षांत अनेकदा पत्रव्यवहार करुनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचेही समोर आले आहे. सामान्य ग्राहक मीटर बदलण्यासाठी गेला असता त्याला मीटर शिल्लक नसल्याचे उत्तर दिले जाते, मात्र दलालामार्फत गेल्यास लागलीच ते उपलब्ध होते. यातून संगमनेरच्या वीज वितरण कंपनीतील अंधाधुंद आणि भ्रष्टाचारी कारभार उघड होत असून आतातरी वरीष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.


या हंगामी कर्मचार्‍याने मीटर खराब असल्याची कारणे सांगून अनेकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतल्याचीही माहिती प्राप्त झाली असून साधारणतः मीटरची अनामत व अन्य गोष्टींची पूर्तता करुन 1 हजार 850 रुपयांपर्यंत बसवून मिळणार्‍या मीटरसाठी त्याने नागरीकांकडून 5 ते 8 हजारांपर्यंतची रक्कम घेतल्याची व सुवर्ण व्यापार्‍याकडून तब्बल 30 हजार रुपये घेतल्याची माहितीही हाती आली आहे. गौण खनिजाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेणार्‍या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सर्वसामान्यांपासून सुखवस्तू कुटुंबातील व्यक्तिंनाही नागवणार्‍या यासर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेवून संगमनेर उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यासह त्यांच्या हाताखाली काम करणार्‍या आठही कनिष्ठ अभियंत्यांच्या मालमत्तांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे. शहरातील सामाजिक संघटनांनी जिव्हाळ्याच्या या प्रश्‍नावर रान उठविण्याचीही गरज यातून निर्माण झाली आहे.


वीज वितरण कंपनीद्वारा ग्राहकांच्या मीटरचे नियमित रिडींग घेण्याचे काम आमची कंपनी करते. मात्र या दरम्यान अनेक मीटर खराब असणे, त्यावरील संख्याच न दिसणे, मीटरच्या वरील आवरण खराब झाल्याने रिडींग घेता न येणे, घरात व उंचावर मीटर असणे अशा अनेक गोष्टी आम्ही वारंवार वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांना लेखी स्वरुपात कळविल्या आहेत. मात्र त्याचा आजवर कोणताही फायदा झालेला नाही, त्यामुळे शहरातील अनेकांच्या देयकांवर मीटर रिडींगची छायाचित्रे नसतात.
कपिल पवार
ठेकेदार कंपनीचे संचालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *