संगमनेर व अकोल्यातील ‘त्या’ परमीट रुमचे परवाने रद्द करा! दारुबंदी कृती समितीची मागणी; कारवाई नंतर पुन्हा ‘बार’ सुरु झाल्याने काढला मोर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात विक्री करण्यास मनाई असलेले मद्य बेकायदशीरपणे आणून ते महाराष्ट्रात विक्री होणार्‍या मद्याच्या बाटल्यांमध्ये भरुन विक्री करण्याचा प्रकार गेल्या ऑगस्टमध्ये समोर आला होता. त्या प्रकरणात रायतेवाडी फाट्यावरील एकासह संगमनेरातील दोघांवर कारवाई झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेर व अकोले येथील सुरभी बिअरबारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश देत ते सिल करण्यास सांगितले होते. मात्र संबंधिताने त्याविरोधात अपिल केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय रद्द झाल्याने सदरील दोन्ही बिअरबार पुन्हा पूर्ववत सुरु झाले आहेत. त्या विरोधात महाराष्ट्र राज्य दारुबंदी कृती समितीने आवाज उठवला असून लोकांच्या जीवाशी खेळणार्‍या ‘त्या’ दोन्ही बिअरबारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचा मागणीसाठी आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या घुलेवाडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकांनी स्वातंत्र्यदिनी रायतेवाडी फाटा येथील एका घरावर छापा घातला होता. या कारवाईत त्यांना गोवा व दमण या राज्यात तयार झालेले व महाराष्ट्रात विक्री करण्यास मनाई असलेले मद्य मोठ्या प्रमाणात सापडले होते. त्याशिवाय राज्यात विक्री होणार्‍या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांसह त्याची झाकणंही (बूच) मोठ्या प्रमाणात आढळल्याने संगमनेर व अकोले तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने चैतन्य सुभाष मंडलीक, सुरेश मनोज कालडा व शिवकुमार मनोज कालडा यांना अटकही केली होती, नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.


या प्रकरणातील कालडा बंधू संगमनेर येथील सुरभी बिअरबार व अकोले येथील सुरभी विंग्ज या परवाना कक्षात काम करणारे नोकर असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी या दोन्ही अनुज्ञप्त्यांची सखोल तपासणी करुन आढळलेल्या तथ्याच्या आधारावर विसंगतीचा गुन्हाही नोंद केला होता. त्यांच्याच अहवालावरुन जिल्हाधिकार्‍यांनी 23 ऑगस्टरोजी या दोन्ही परवाना कक्षांचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत निलंबित केले होते. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने 24 ऑगस्टरोजी संगमनेर व अकोले येथील दोन्ही बिअरबार सिलही केले. या प्रकरणात नंतरच्या महिनाभरात जिल्हाधिकार्‍यांसमोर झालेल्या सुनावण्यांमध्ये हे दोन्ही परवाना कक्ष दोषी आढळल्याने जिल्हाधिकार्‍यांनी 24 सप्टेंबररोजी या दोन्ही अनुज्ञप्त्या कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले होते.


त्या विरोधात अनुज्ञप्तीधारक ओमप्रकाश चुनीलाल कालडा व शोभा ओमप्रकाश कालडा यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे अपील केले होते. त्यावर वेळोवेळी झालेल्या सुनावण्यानंतर 1 नोव्हेंबररोजी त्यांनी आयुक्तांनी वरील दोन्ही अनुज्ञप्तीधारकांना प्रत्येकी एक लाखांचा दंड करुन त्यांचे व्यवहार सुरळीतपणे सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे वरील दोन्ही अनुज्ञप्तीधारकांनी 11 नोव्हेंबररोजी दंडाची पूर्ण रक्कम शासकीय कोषागारात जमा केल्यानंतर संगमनेर व अकोले येथील सुरभी बिअरबार सुरु करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र दारुबंदी कृती समितीने त्या विरोधात आंदोलनास सुरुवात केली असून त्याचाच भाग म्हणून आज (ता.30) घुलेवाडीतील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता.


यावेळी दारुबंदी समितीचे अध्यक्ष अमर कतारी यांनी सदरील दोन्ही ठिकाणी बनावट दारु विक्री होत असल्याच्या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रीत करतांना अशाप्रकारची दारु प्यायल्याने संगमनेर व अकोले तालुक्यातील अनेकांना किडनीचे विकार झाले, त्यात काहींचे जीव गेले तर काहींना लाखों रुपयांचे औषधोपचार घेण्याची वेळ आल्याचे सांगत सदरील बिअरबार कायमस्वरुपी बंद करावेत अशी जोरदार मागणी केली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही दुय्यम निरीक्षक महेंद्र कोंडे यांना दिले. यावेळी कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब हासे, गोविंद नागरे, सोमनाथ भालेराव, संभव लोढा, रंगनाथ फटांगरे, सचिन साळवे, राजू सातपुते, आशा केदारी, संगिता गायकवाड, योगेश खेमनर, लखन सोन्नर, फैजल सय्यद आदींसह समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *