राजूरमध्ये बिबट्याची दहशत; सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद पाळीव प्राणी लक्ष्य; वन विभागाने पिंजरा लावण्याची गरज


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोकणवाडी येथील आदिवासी महिलेस बिबट्याने ठार केल्यानंतर सातत्याने बिबट्याची दहशत सुरू आहे. तीन ते चार बिबटे परिसरात फिरत असून, सोमवारी (ता.28) मध्यरात्री बिबट्याने राजूर येथे एक शेळी व एका कुत्र्याचा फडशा पाडला. राजूर येथे बिबट्याने गावातील गणपती मंदिरामागील वस्तीत प्रवेश करून दहशत निर्माण केली असून सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तो कैद झाला आहे.

निळवंडे, चितळवेढा परिसरात उसाची शेती असल्याने, लपण्यासाठी मुबलक जागा असल्याने परिसरात बिबटे आढळून येतात. सायंकाळी सहा वाजता बिबटे रस्त्यावर दिसू लागले आहेत. शेळ्या, कोंबड्या, जनावरे व माणसांवर चाल करत आहेत. गणपत देशमुख हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी घरी परतत असताना त्यांच्या कळपातील एक शेळी त्याने पळवून नेली. वन विभागाने, पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले, मात्र तसे पाऊल उचलण्यात आले नाही.

चितळवेढा घाट पार करून बिबट्या काल मध्यरात्री राजूर शहरात पोचला. संरक्षक भिंतीवरुन उडी मारून त्याने विमा प्रतिनिधी गिरीश बोराडे यांच्या कुत्र्याचा फडशा पाडला, तर गणपती मंदिर परिसरातील स्वप्नील काळे यांच्या घराबाहेर सावज शोधत होता. मात्र, त्यांच्या कुत्र्याला चाहूल लागताच त्याने जोरजोरात भुंकण्यास सुरवात केली. त्याचवेळी परिसरातील दहा बारा कुत्र्यांनी एकत्र येत बिबट्याचा समाचार घेतला, त्यामुळे त्याने धूम ठोकली. मातोश्री राइस मिलकडे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तो कैद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *