संगमनेरच्या क्रीडा संकुलाला छत्रपतींचे नाव : जहागिरदार पालिका निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच ऐन थंडीत संगमनेरातील राजकीय वातावरण तापू लागले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंधरा वर्षांपूर्वी संगमनेर नगरपरिषदेने बांधलेले क्रीडा संकुल शासकीय मालमत्ता आहे. या क्रीडा संकुलासाठी पालिकेने राज्य शासनाकडून साडेतीन कोटी रुपयांचा निधीही मिळवला आहे. मात्र क्रीडा संकुलाचे नामकरण करतांना सत्ताधारी पक्षाने खासगी नाव दिल्याने अनेकांना ही गोष्ट रुचलेली नाही. त्यामुळे जनभावनेचा विचार करुन आगामी पालिका निवडणुकीत संगमनेरकरांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखविल्यास पालिकेच्या मालकीच्या क्रीडा संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा शहर भाजपाचे सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी पालिकेच्या स्वनिधीसह शासनाकडून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मिळवून कचेरीमागील जवळपास पाच एकरच्या मैदानावर क्रीडा संकुल उभारले. सुरुवातीला या क्रीडा संकुलाला कोणतेही नाव देण्यात आले नव्हते. 2006 साली पालिकेच्या नगराध्यक्षपदी दुर्गा तांबे यांची निवड होताच या क्रीडा संकुलाच्या नामकरणाचा घाट घालण्यात आला आणि त्याचे नामकरण करतांना ‘सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल’ असे करण्यात आले. हा प्रकार अनेकांना रुचला नसल्याचेही जहागिरदार यांनी या पत्रकातून सांगितले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रति आमच्या मनातही नितांत आदर आहे. मात्र शासकीय मालमत्तांना अशाप्रकारे खासगी व्यक्तींची नावे देणे अयोग्य आहे. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांना आपल्या वडिलांचे नावे देण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांच्या खासगी अथवा सहकारातून उभ्या केलेल्या मालमत्तांना ती द्यावीत असा सल्लाही जहागिरदार यांनी दिला आहे. वास्तविक राज्यातील अनेक ठिकाणच्या अशाप्रकारच्या संकुलांना छत्रपती शिवरायांची अथवा महापुरुषांची नावे आहेत. त्यामुळे संगमनेरकरांनी भारतीय जनता पार्टीव्र विश्वास दाखवून आमच्या हाती पालिकेची सत्ता दिल्यास छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ प्रतिमेसह क्रीडा संकुलाचे नामकरण करण्याची ग्वाही आम्ही देत असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

संगमनेर नगरपरिषदेवर गेल्या तीस वर्षांपासून माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांची एकहाती सत्ता आहे. मोठा गाजावाजा करीत पालिकेने पाच एकरहून अधिक मोठ्या जागेवर क्रीडा संकुल उभारले आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या करातून जमा झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या क्रीडा संकुलाचा शहरातील क्रीडापटूंना मोठा फायदा होईल, या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन होईल असे पालिकेच्यावतीने त्यावेळी सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र आजवर असे चित्र बघायला मिळाले नसल्याचा आरोपही जहागिरदार यांनी या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

या क्रीडा संकुलात फक्त युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्त्वाखालील क्रिकेट स्पर्धाच होतात. त्याशिवाय आजवर त्याचा कोणताही फायदा शहरातील खेळाडूंना झाला नसल्याचे सांगत सत्ताधार्यांनी सदरची शासकीय मालमत्ता आपल्या मालकीची असल्यागत त्याचा वापर केल्याचा गंभीर आरोपही जहागिरदार यांनी केला आहे. पूर्वी या मैदानावर मोठ्या प्रमाणात मुले खेळायला यायची, मात्र सदरचे क्रीडा संकुल तयार झाल्यानंतर ते सगळे प्रकार आणि त्यांचा खेळही बंद झाला असून आज शहरात मुलांना खेळण्यासाठी मैदानच नसल्याची स्थिती आहे. या क्रीडा संकुलाचा वापर पूर्णतः नागरीकांसाठीच झाला पाहिजे अशी भाजपाची भूमिका असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये संगमनेरकरांनी भाजपावर विश्वास दाखविल्यास या ऐतिहासिक शहरात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ प्रतिमा असलेल्या भव्य-दिव्य स्मारकासह पालिकेच्या मालकीच्या क्रीडा संकुलाला त्यांचे नाव देण्यात येईल अशी भाजपाच्यावतीने आम्ही ग्वाही देत असल्याचेही या प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *