अमृतवाहिनीत डॉ. संतोष पवारांच्या काव्यधारांनी श्रोते मंत्रमुग्ध स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त केले अभिवादन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेतकरी कवी प्रा. डॉ. संतोष पवार व खानदेशातील कवी प्रा. प्रदीप पाटील यांच्या काव्य मैफिलीत मायलेक, सासू-सून, ग्रामीण स्त्रियांच्या जीवनाच्या वर्णन करणार्‍या कवितांनी उपस्थित रसीक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल येथील यशवंत तीर्थवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, विश्वस्त अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, तुळशीनाथ भोर, प्रा. बाबा खरात, सुधाकर जोशी, विष्णूपंत रहाटळ, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ. मनोज शिरभाते, प्रा. एस. टी. देशमुख, प्रा. जी. बी. काळे, प्राचार्या शीतल गायकवाड, शोभा हजारे, नामदेव गायकवाड, अंजली कन्नमवार आदी उपस्थित होते.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आदर्श होते. त्यांचाच वारसा घेवून विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात काम करत आहेत. महाराष्ट्राच्या साहित्य, समाजकारण, शेती, कृषी औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांची पायाभरणी करणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र होते. पहिले मुख्यमंत्री ते भारताचे उपपंतप्रधान या सर्व प्रवासात यशवंतरावांनी साधेपणा कायम जपला असून त्यांचे व्यक्तिमत्व हे पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरले आहे, असे माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या.

कवी संतोष पवार यांनी सासुरवासणीच्या जीवनावरील माहेराला माती होती, सासरला माती माती ही मन हे लावून टाकणारी कविता सादर केली. त्यानंतर ग्रामीण भागातील सासुरवासिनीचे दुःख मांडताना काल पेटलेला बाई कसा हिजला संगर, गेले जहाज तुटून मागे राहिला नांगर. ही कविता सादर केली याचबरोबर आई बापाला वृद्धाश्रमात पाठवणार्‍या मुलांच्या कृतघ्नतेबद्दल बाईपणाच्या जातीला घोर लागलेला शाप, दूध तिचेच पिऊन कसे बनतात साप ही कविता सादर केली. याचबरोबर राजकीय धुळवळीवरही त्यांनी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रदीप पाटील यांनी विडंबनात्मक विविध चारोळ्यांमधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका करताना माध्यमांनी तोंडावर लावलेल्या मास्कबाबत प्रखर टीका केली. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *