निळवंडे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार! नागरिकांत भीतीचे वातावरण; वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी..


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील निवळंडे परिसरातील खडके वस्ती येथील एका वृद्ध महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.24) पहाटेच्या साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. वृद्ध महिला घरात झोपलेली असताना बिबट्याने अचानक हल्ला करुन जंगलात ओढत नेऊन ठार केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

या घटनेबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, निळवंडे परिसरातील खडके वस्ती येथील रखमाबाई तुकाराम खडके (वय 62) या घरात झोपलेल्या असताना पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत त्यांना पाचशे फूट अंतरावरील जंगलात ओढून नेले. हल्ला करतेवेळी त्यांनी मोठा आरडाओरड केला. हा आवाज ऐकून त्यांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर परिसरात सर्वत्र त्यांचा शोध घेतला असता त्या मृतावस्थेत मिळून आल्या.

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच राजूर वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे, वन कर्मचारी, अकोले व राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने येथे पिंजरा लावून नरभक्षक बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निळवंडेतील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस आणि वन विभागाने पंचनामा केला आहे. वन विभागामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल. परंतु, या परिसरात उसासह इतर पिके असल्याने बिबट्यांचा मोठा अधिवास आहे. त्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. काही धोका वाटल्यास वन विभागाशी संपर्क करावा.
– राजश्री साळवे (वनपरिक्षेत्र अधिकारी-राजूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *