संगमनेरात बोकाळलेले अवैध व्यवसाय तत्काळ बंद करा! शिवसेना उपशहर प्रमुखाची मागणी; अन्यथा आमरण उपोषण करणार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात सध्या विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांनी मोठ्या प्रमाणात बस्तान बांधले आहे. जुगार व मटका या सारख्या धंद्यांमधून सामान्य माणसांची आर्थिक पिळवणूक होत असून अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. गेल्या काही वर्षात संगमनेरात गांजा विक्रीचे स्तोमही सर्वत्र वाढल्याने विद्यार्थी अवस्थेतील तरुण मुले त्याला बळी पडत आहेत. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने अशाप्रकारच्या व्यसनांसाठी शहराच्या चोहोबाजूला बेकायदा ‘हुक्का पार्लर’ही सुरु झाले असून वारंवार तक्रारी करुनही पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. गोवंश कत्तलखाने, वाळू तस्करी व गुटखा विक्री तर शहराच्या पाचवीलाच पूजलेली असल्याने येत्या आठ दिवसांत संगमनेरातील सर्वप्रकारे अवैध व्यवसाय बंद न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे गट) उपशहर प्रमुख विकास डमाळे यांनी पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संगमनेरात चालणार्‍या विविध अवैध व्यवसायांचा ऊहापोह केला असून शहराच्या अनेक भागात जुगार, मटका, गांजा व गुटखा विक्री करणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे म्हंटले आहे. स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा व अहमदनगर पोलिसांकडून यापूर्वी असंख्यवेळा छापे पडूनही संगमनेरातील गोवंश कत्तलखाने आजही सुरुच असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकारांबाबत आपण यापूर्वी स्थानिक पोलीस व महसूल अधिकार्‍यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या व्यवसायांना त्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा गंभीर आरोपही डमाळे यांनी निवेदनातून केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांवर कारवाईसाठी स्थानिक पोलिसांना फोन केला असता त्यांच्याकडून नियंत्रण कक्षाच्या 112 क्रमांकावर तक्रार करण्याच्या सूचना दिल्या जात आहे. त्यानुसार नियंत्रण कक्षाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या व त्यानुसार कारवाई देखील झाली आहे. गेल्या 6 नोव्हेंबर रोजी आपण गुंजाळवाडी शिवारातील एका बिअरबारमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार स्थानिक पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी विलंबाने ‘त्या’ठिकाणी पोहोचला. यावेळी संबंधिताने तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे अपेक्षित असताना सदर कर्मचार्‍याने बारचालकास आपले नाव सांगून समोरासमोर त्याची भेट घालून दिल्याने आपली ओळख उघड होवून जीवितास धोका निर्माण झाल्याचेही डमाळे यांनी या निवेदनातून सांगितले आहे.

संगमनेरातील अवैध व्यवसायांवर यापूर्वी नाशिक, अहमदनगर व मुंबई पोलिसांनी वेळोवेळी येवून छापे घातले, मात्र त्या उपरांतही स्थानिक पोलिसांना या धंद्यांचे उच्चाटन करता आलेले नसल्याने या सर्व व्यवसायांना त्यांचे समर्थन असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही या निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. शहरात गांजासह विविध प्रकारचे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी दशेतील तरुण मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यातच पोलिसांच्या आशीर्वादाने शहराभोवती आणि महाविद्यालयांच्या परिसरात हुक्का पार्लर आणि कॉफी शॉपच्या नावाखाली बेकायदा उद्योग सुरु झाल्याने देशाची नवीन पिढी उध्वस्त होत आहे. या सर्व प्रकारांवरुन शहर पोलिसांची भूमिका अतिशय संशयास्पद असून यासर्व अवैध धंद्यांना त्यांचेच समर्थन असल्याचेही दिसत आहे.

शहर पोलीस ठाण्यातून बदली होवून मोठा कालावधी लोटलेले कर्मचारी आजही आहे तेथेच कार्यरत असल्याने त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्तींशी घनीष्ट संबंध निर्माण झाले आहे. सध्या शहर पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार दोन पोलीस कर्मचारी हाकीत असल्याचा गंभीर आरोपही डमाहे यांनी केला असून पुढील आठ दिवसांत संगमनेरातील गांजा, जुगार, मटका, गुटखा, वाळू व गोवंशाच्या कत्तलखान्यांसह अन्य अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद न केल्यास आपण आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. त्यांच्या या निवेदनाची पोलीस अधीक्षक राकेश ओला किती गांभीर्याने दखल घेतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *