उद्धवा अजब तुझे सरकार! एकनाथा अजब तुझा चमत्कार!! ‘त्या’ फ्लेक्सने वेधले संगमनेरकरांचे लक्ष्य; बसस्थानक परिसराचे विद्रुपीकरण थांबेना..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रांताधिकार्‍यांपासून ते आगार व्यवस्थापकापर्यंतच्या सगळ्याच अधिकार्‍यांना एकाचवेळी ‘ऑन-द-स्पॉट’ दिलेल्या ‘त्या’ आदेशाचा राज्यात सत्ता परिवर्तन होताच अधिकार्‍यांना विसर पडला आहे. त्यामुळे मध्यंतरी काहीकाळ ‘फ्लेक्समुक्त’ झालेल्या संगमनेरच्या देखण्या बसस्थानकाचा परिसर पुन्हा एकदा नेते आणि कार्यकर्ते यांच्या शुभेच्छा फ्लेक्सच्या दाटीत हरवला असून त्या गर्दीत रविवारी शिरलेल्या ‘अजब’ फ्लेक्सने ‘गहजब’ केला आहे. संगमनेरकरांचे लक्ष्य वेधणारा हा फ्लेक्स निंभाळे येथील एका ज्येष्ठ नागरिकाने लावल्याची चर्चा असून दिवसभर हा इसम बसस्थानक परिसरातच वावरत असल्याचे समजते.

रविवारी (ता.20) रात्रीच्यावेळी नवीन नगर रस्त्याच्या वळणावरील इंदिरा गांधी स्मारकाच्या अगदी समोरच सदरचा फ्लेक्स उभारण्यात आला आहे. एरव्ही या भागाला नेहमीच फ्लेक्स आणि जाहिरात फलकांचा गराडा असल्याने त्याकडे फारसे कोणाचे लक्ष्य जात नाही, मात्र या फलकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरगडे गल्लीतील स्मारकाच्या दिशेने येणार्‍या प्रत्येकाला आपल्याकडे पाहण्यास भाग पाडले आहे. विशेष म्हणजे बसस्थानकामुळे वैभवात भर पडलेल्या या परिसराचे सौंदर्य वाढावे यासाठी पालिकेने लाखो रुपयांचा खर्च करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा चितारीत त्या पुढ्यात छोटेखानी ‘कॉर्नर उद्यान’ उभारले आहे. त्याच्या समोरच हा फ्लेक्स लावण्यात आल्याने महात्मा गांधींची प्रतिमा आणि उद्यान दोन्ही गोष्टी झाकल्या गेल्या आहेत.

या फ्लेक्सवर अगदी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, शालिनी विखे, डॉ. सुजय विखे, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात, माजी मंत्री-आमदार बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, दुर्गा तांबे, सत्यजीत तांबे यांच्यापासून ते थेट रणजीत देशमुख, शरयू देशमुख व राजवर्धन थोरात यांच्यापर्यंतच्या विविध 25 जणांची छायाचित्रे आहेत.

राज्यात एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांना एकाच फ्लेक्सवर एकत्रित आणणार्‍या या महाशयांनी त्यावरील मजकूरही विचारात पाडण्यासारखाच लिहिला असून तो वाचून काहींना हसवाचे धुमारे फुटत आहेत, तर काहींच्या डोक्याला मुंग्या आल्या आहेत. या फ्लेक्सवर ‘राम राम गेलं आणि जय श्रीराम आलं!’ असा मथळा लिहिण्यात आला आहे. त्याखाली ‘उद्धवा अजब तुझे सरकार, एकनाथा अजब तुझा चमत्कार. हा माझा शेवटच्या क्षणापर्यंत नमस्कार, भारत माता की जय, वंदे मातरम् व मातृभूमी तुझे सलाम’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. एका बाजूला सदरचा फ्लेक्स लावणार्‍या ज्येष्ठ नागरिकाचा हातात तिरंगा ध्वज घेतलेला फोटोही आहे.

या फ्लेक्सवर भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांची छायाचित्रे असून ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असं म्हंटले असले तरी प्रत्यक्षात मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र वगळता ठाकरे गटातील कोणाही नेत्याचा त्यात समावेश नाही, मात्र त्याचवेळी शिवसेना प्रमुखांशेजारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र घेण्यात आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचा प्रवाह एकाच फलकावर साठवण्याचा हा प्रयत्न संगमनेरकरांसाठी कुतूहलाचा ठरला असला तरीही त्यातून वेगवेगळे फंडे वापरुन शहर विद्रुपीकरणाची ही कृतीही अनेकांना रुचलेली नाही. त्यामुळे एकीकडे हा फलक काहींचे मनोरंजन करीत असला तरीही दुसरीकडे अनेकांचा रोषही वाढवणारा ठरला आहे.

वास्तविक बसस्थानकाच्या परिसराचे विद्रुपीकरण होवू नये यासाठी तत्कालीन महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी या रस्त्यावरुन जाताना तेथे थांबत अधिकार्‍यांना स्पष्ट शब्दांत फटकारले होते. यावेळी त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याने लावलेला भलामोठा फ्लेक्स आपल्या उपस्थितीत काढण्यास सांगून यानंतर कोणाचाही फ्लेक्स या भागात लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचना उपस्थित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यात प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, आगारप्रमुख अशा सगळ्याच अधिकार्‍यांचा समावेश होता. त्यांच्या या आदेशानंतर साधारणतः वर्षभर हा परिसर फ्लेक्समुक्त झाला, मात्र आता पुन्हा एकदा या भागात फ्लेक्सची दाटी वाढू लागली असून हा संपूर्ण परिसर विद्रुप दिसू लागला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विखे समर्थकांकडून राजकीय दबावाचा वापर करुन या परिसरात फ्लेक्स उभारले जात आहेत. बसस्थानकाच्या आवारात लावण्यात आलेले फ्लेक्स आगार प्रमुखांच्या तर इतरत्र लावलेले फ्लेक्स पालिकेच्या अधिकार कक्षात येतात. पालिकेकडून सध्या फ्लेक्स लावण्याची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे या फ्लेक्सच्या चर्चेनंतर त्यांनी कारवाईची तयारी केली आहे.मात्र आगारप्रमुखांची अवस्था असूनही नसल्यागत असल्याने अनेक स्वयंघोषीत पुढारी, नेते व कार्यकर्ते त्याचा गैरफायदा घेत शहराच्या विद्रुपीकरणात भर घालीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *