ज्ञानेश्वरीत समाजाला संजीवनी देणारा विचार ः लेले राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या ‘अमृत मंथन’चा समारोप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शत्रूशी रणांगणात दोन हात करणारा शूर असावाच लागतो पण आध्यात्मिक प्रवाहात समरस होणारा त्याहीपेक्षा शूर असावा लागतो. कारण त्याचे युध्द त्याच्या स्वतःशी असते. हे युध्द जिंकणे तुलनेने कठीण असते. म्हणून जिंकताना योद्ध्याचा कस लागतो. तरुण, वृद्ध, पुरुष, महिला अशा सर्वांसाठीच ज्ञानेश्वरीमधील मार्गदर्शक विचार अनमोल आहेत. एकंदरीत संपूर्ण समाजाला संजीवनी देणारा सात्विक आणि पोषक विचारांचा खजिना ज्ञानेश्वरी मध्ये असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द निरुपणकार धनश्री लेले यांनी केले.

राजस्थान युवक मंडळाच्यावतीने ‘अमृत मंथन’ या विषयावरील त्यांच्या दोन दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचा रविवारी समारोप झाला. यावेळी लेले बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, खजिनदार व्यंकटेश लाहोटी, सचिव आशीष राठी, कैलास राठी आदी उपस्थित होते. अतिशय रंगलेल्या या व्याख्यानात लेले यांनी ज्ञानेश्वरीमधील विचारवैभव रसिकांना कुशलतेने उलगडून दाखविले. श्रीकृष्ण-अर्जुन यांचे अनोखे नाते आणि त्यांचे अर्थपूर्ण तात्विक संवाद त्यांनी मथितार्थासह श्रोत्यांना समजावून सांगितले. अनेक बोधकथा व आध्यात्मिक दाखले देत लेले यांनी ज्ञानेश्वरीवरील निरुपण खूप उंचीवर नेऊन ठेवल्याने श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेळोवेळी मिळत गेला आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रास्ताविक केले. संगमनेरमधील रसिक श्रोत्यांची खूप वर्षांची इच्छा धनश्री लेलेंच्या व्याख्यानाने आज पूर्ण करण्याची संधी राजस्थान युवक मंडळाला मिळाली याचे मोठे समाधान असल्याचे ते म्हणाले. डॉ. संजय मालपाणी यांनी लेले यांच्या रूपाने साक्षात सरस्वती संगमनेरमधील श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरीमधील वैचारिक खजिना मांडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रचना मालपाणी यांनी लेले यांचा परिचय करुन दिला. ओम इंदाणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आशीष राठी यांनी आभार मानले. दोन दिवस वैचारिक मेजवाणी लाभलेल्या या कार्यक्रमाला संगमनेरकर रसिकांची मोठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *